Video पाकिस्तानी हल्ल्याने चवताळला तालिबान,वेगवेगळ्या भागात हवाई हल्ले
पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानमध्ये मोठी कारवाई केल्याने तालिबान चवताळला आहे. पाकिस्तानी हवाई दलाने तेहरीक-ए-तालिबानला लक्ष्य करत उत्तर आणि दक्षिण वझिरिस्तानजवळील दोन वेगवेगळ्या भागात हवाई हल्ले केले.
अफगाण मीडियाच्या म्हणण्यानुसार, पक्तिका प्रांतातील लमान आणि खोस्त प्रांतातील पासा मेला येथे हे हल्ले करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पक्तिका प्रांतात टीटीपीशी संबंधित अब्दुल्ला शाह याच्या घराला लक्ष्य करण्यात आले आहे. अब्दुल्ला शाह हा टीटीपीचा कमांडर आहे, टीटीपीच्या सूत्रांनीही या हल्ल्याला दुजोरा दिला असून, या हल्ल्यात अब्दुल्ला शाह याच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या अफगाण सीमेत घुसून केलेल्या या हल्ल्याचा तालिबान सरकारने तीव्र निषेध केला आहे.
د افغانستان پر خاوره د پاکستاني الوتکو د تجاوز او بمبار په اړه د افغانستان اسلامي امارت د وياند څرګندونې. pic.twitter.com/TcWB9rCDOM
— Hamdullah Fitrat (@HalimyarF) March 18, 2024
दरम्यान, पाकिस्तानच्या या कारवाईचा निषेध करत तालिबानने हा हल्ला अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाविरुद्ध असल्याचे म्हटले आहे. तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “पाकिस्तानी विमानांनी अफगाणिस्तानच्या सीमेवर नागरिकांच्या घरांवर बॉम्बहल्ला केला, ज्यामध्ये पक्तिका प्रांतात तीन महिला आणि तीन मुलांसह सहा जण ठार झाले आणि खोस्तमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला.”
तालिबानने कडक शब्दात इशारा दिला
दुसरीकडे, अफगाणिस्तान सीमेच्या आत झालेल्या हवाई हल्ल्यावर तालिबानने पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला. तालिबानने म्हटले की, ”जगातील महासत्तांविरुद्ध आपल्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा आम्हाला प्रदीर्घ अनुभव आहे, आम्ही कोणालाही आमच्या हद्दीत हल्ला करु देत नाही. पाकिस्तानने आपल्या देशातील परिस्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे, पाक लष्कराने उचललेल्या या पावलाचे वाईट परिणाम होतील.”