पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तेथे राहणारे हिंदू आणि मुस्लिम लोक आमचेच
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तेथे राहणारे हिंदू आणि मुस्लिम लोक आमचेच आहे, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.
काश्मीरचा जो भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे, तो भारताचाच असल्याचं अमित शहा यांनी ठणकावून सांगितलं आहे. याशिवाय CAA कायद्याला विरोध करणाऱ्यांवर देखील शहा यांनी टीकास्त्र डागलंय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (ता. १५) नवी दिल्लीत एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीतून त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर भाष्य करत विरोधकांवर टीकास्त्र डागलं. CAA बाबत विरोधी पक्ष मुस्लिम समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप यावेळी अमित शहा यांनी केला.
CAA मध्ये नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही, असं स्पष्ट करत अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. स्वातंत्र्याच्या वेळी पाकिस्तानमध्ये २३ टक्के हिंदू होते. आज त्यांची संख्या २.७ टक्क्यांवर आली आहे. बाकीचे गेले कुठे? त्यांचे काय झाले? असा सवाल अमित शहा यांनी उपस्थित केला.
आज बांगलादेशात १० टक्क्यांहून कमी हिंदू उरले आहेत. ते कुठे गेले? असा प्रश्न उपस्थित करत शेजारील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतरे झाली. तेथील हिंदू बांधवांवर अन्याय झाला. त्यामुळेच त्यांनी भारतात आश्रय घेतला असून आम्ही त्यांना नागरिकत्व का देऊ नये? असं म्हणत अमित शहा यांनी विरोधकांवर चांगलाच संताप व्यक्त केला.
“आम्ही कधीच फाळणीच्या बाजूने नव्हतो. आम्ही निर्णायक स्थितीत असतो तर आम्ही फाळणी होऊ दिली नसती. पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायातील ज्यांना अत्याचार झाल्याचे वाटत होते, त्यांना फाळणीच्या वेळी आश्वासन देण्यात आले होते की, ते नंतर भारतात येऊ शकतात. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर आमचे आहे आणि तेथील हिंदू-मुस्लिमही आमचे आहेत”, असं अमित शाह म्हणालेत.