‘मी जग उद्ध्वस्त करणारा मृत्यू आहे’ 2 लाख लोकं मेली अन् 2 शहरं बेचिराख, हे पाहून Oppenheimer यांना का आठवली भगवत गीता
‘ओपेनहायमर’ (oppenheimer) सिनेमाने आधी बॉक्स ऑफिसवर राज्य करत अब्जावधी डॉलरचा गल्ला जमवला आणि आता सात ऑस्कर पुरस्कारांवरही या सिनेमाने आपलं नाव कोरलं आहे.
सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची बक्षिसं ‘ओपेनहायमर’ ने पटकावली आहेत. पण ज्यांच्या जीवनावर हा बायोपिक आधारलेला आहे ते महान अमेरिकी शास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपेनहायमर (J. Robert Oppenheimer) नक्की होते तरी कोण? हे अनेकांना माहीत नाही.
ज्युलियस रॉबर्ट ओपेनहायमर यांचा जन्म 22 एप्रिल 1904 रोजी न्यूयॉर्क शहरातील एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे वडिल एक जर्मन स्थलांतरित होते आणि कपड्यांचे व्यावसायिक होते. एला फ्रिडमन ही त्यांची आई. ती चित्रकार होती. तिचं कुटुंब अनेक वर्ष न्यूयॉर्कमध्ये वास्तव्य करत होतं. त्यांच्या धाकट्या भावाचं नाव फ्रॅंक असं होतं. ओपेनहायमर एक भौतिक शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी एका अणुबॉम्बची निर्मिती केली होती. त्यांचं व्यक्तिमत्वही अत्यंत गूढ होतं. असं म्हणतात की त्यांचे आजोबा 1888 मध्ये जर्मनीतून अमेरिकेत आले तेव्हा त्यांच्या खिशात एक पैसाही नव्हता. त्यांना इंग्रजी भाषाही येत नव्हती. एका टेक्सटाईल कंपनीत नोकरीला लागल्यावर मात्र अवघ्या काही वर्षांतच ते खूप श्रीमंत झाले. त्यानंतर हे कुटुंब मॅनहॅटन इथं राहाण्यास गेलं. रॉबर्ट व्यतिरिक्त त्यांचा भाऊ फ्रॅंक हाही एक भौतिक शास्त्रज्ञ होता.
रॉबर्ट यांचं शिक्षण न्यूयॉर्कमधील एथिकल कल्चरल स्कूलमध्ये झालं. 1922 मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून केमिकल सायन्स विषयात त्यांनी बीए केलं. 1925 मध्ये कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत शिकायला ते इंग्लंडमधील केंब्रिजला गेले. त्यानंतर जर्मनीतील गॉटिंगन युनिव्हर्सिटीतील इन्स्टिट्युट ऑफ थिअरॉटिकल फिजिक्स इथे नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ मॅक्स बोर्न यांच्या सहवासात राहून शिकायला रॉबर्ट गेले. 1927 मध्ये फिजिक्समध्ये पीएचडी पूर्ण करून ते अमेरिकेला परतले. 1929 मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी आणि बर्कले आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवू लागले. ते क्वांटम मेकॅनिक्स आणि थिअरॉटिकल फिजिक्स शिकवत असत.
अखेर अणुबॉम्ब तयार झाला
1940 मध्ये त्यांनी जर्मन अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ व प्राणीशास्त्रज्ञ कॅथरिन पुएनिंग यांच्याशी विवाह केला. त्यांना पीटर आणि कॅथरिन अशी दोन मुलं झाली. पुढे त्यांनी अनेक दिग्गज शास्त्रज्ञांच्या भेटी घेऊन परिचय करून घेतला. पुढे मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये त्यांनी एकत्र काम केलं. याच प्रोजेक्टअंतर्गत अमेरिकेत अणुबॉम्ब तयार करण्यात आला होता. 1942 मध्ये न्यू मॅक्सिकोतील लॉस अलामोस येथील एका शस्त्रास्त्र प्रयोगशाळेत निदेशक म्हणून रॉबर्ट यांची नियुक्ती झाली. या प्रयोगशाळेला एका अणुबॉम्बची निर्मिती करायची होती. कोडनेम म्हणून त्याला ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’ असं संबोधलं जात असे. या प्रकल्पासाठी अमेरिकेतील अनेक ठिकाणी गुप्तपणे प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या होत्या. लॉस अलामोसमध्ये ओपेनहायमर यांनी फिजिक्समधील अनेक दिग्गज शास्त्रज्ञांना एकत्र आणलं होतं. अडीच वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर त्यांना हवं होतं ती वस्तू तयार करण्यात या शास्त्रज्ञांना यश आलं.
‘लिटिल बॉय’ने जपानची 2 शहरं केली उद्ध्वस्त
त्यानंतर 1945 च्या उन्हाळ्यापर्यंत युरेनियम बॉम्ब (लिटिल बॉय) आणि प्लुटोनियम बॉम्ब (फॅट मॅन) बनवण्याचे आदेश अमेरिका सरकारने या शास्त्रज्ञांना दिले होते. 16 जुलैला त्यांनी प्लुटोनियम बॉम्बची पहिली चाचणी केली. जॉन डोनेच्या कवितेवर आधारित त्यांनी या चाचणीला ‘ट्रिनिटी टेस्ट’ असं नाव दिलं. लॉस अलामोसपासून 210 मैल दक्षिणेला असलेल्या ‘जर्नी ऑफ डेथ’ नावाच्या ठिकाणाची या चाचणीसाठी निवड करण्यात आली होती. पहाटे साडेपाचला चाचणी यशस्वी झाली आणि अणुयुगाची नांदी झाली. यानंतर तीन आठवड्यांमध्ये 6 ऑगस्ट 1945 ला लिटिल बॉयने जपानचं हिरोशिमा हे शहर उद्ध्वस्त केलं. त्यानंतर तीन दिवसांनी 9 ऑगस्टला फॅट मॅनने नागासाकी गिळंकृत केलं. या दोन स्फोटांमध्ये किमान दोन लाख लोकांनी आपला जीव गमावला.
‘मी जग उद्ध्वस्त करणारा मृत्यू आहे’
ओपेनहायमर स्वतःही आपल्या कामामुळे झालेल्या या विध्वंसाने थक्क झाले. अणुचाचणीनंतर त्या नियंत्रण कक्षात असताना ‘मी जग उद्ध्वस्त करणारा मृत्यू आहे’ ही भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूपाबद्दल म्हटलेली गीतेतील ओळ ओपेनहायमर यांना आठवली. दुसरं महायुद्ध संपल्यावर मॅनहॅटन प्रोजेक्ट हे अणुऊर्जा आयोगाच्या अखत्यारित आणलं गेलं. सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून ओपेनहायमर तिथे कार्यरत होते. तिथे अणु बॉम्बच्या तुलनेत हजार पट विध्वंसक अशा हायड्रोजन बॉम्बच्या निर्मितीला त्यांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि जगभरातील विज्ञानाशी संबंधित संस्थांमध्ये व्याख्यानं देण्यासाठी प्रवास केला. 18 फेब्रुवारी 1967 ला गळ्याच्या कॅन्सरशी झुंज देताना त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी ते 62 वर्षांचे होते. ,विशेष म्हणजे, 1930 च्या सुरुवातीला ओपेनहायमर संस्कृत शिकले होते. गीता आणि कालिदासाच्या मेघदुतचं त्यांनी वाचन केलं होतं. ते गीतेचे प्रशंसक होते; पण हिंदू धर्माकडे मात्र त्यांचा कल नव्हता.