महायुतीचा पहिला उमेदवार ठरला, एकनाथ शिंदेंनी केली शिवसेना उमेदवाराची घोषणा
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेतून या उमेदवाराची घोषणा केली आहे. शिवसेना महिला सेनेचं शिवदुर्गा महिला संमेलन मुंबईच्या सायनमध्ये पार पडलं, या कार्यक्रमातून एकनाथ शिंदे यांनी मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे रिंगणात उतरतील, याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
‘मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार कोण आहे माहिती आहे ना? राहुल शेवाळे यांना निवडून द्यायचं आहे,’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाची अप्रत्यक्षरित्या घोषणा केली.
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जागावाटपाबाबत बैठक झाली होती. यानंतर हे तीनही नेते दिल्लीमध्येही जागावाटपाची चर्चा करण्यासाठी गेले होते, पण अजूनही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीने महाराष्ट्रातला जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला गेला नाही.
दुसरीकडे महाविकासआघाडीमध्येही जागावाटपावरून तिढा निर्माण झाला आहे, त्यामुळे त्यांनीही उमेदवारांची घोषणा केली नाही, पण शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने एकूण 5 उमेदवार घोषित केले आहेत. शिवसेना ठाकरे पक्षातून रायगडमधून अनंत गिते, मावळमधून संजोग वाघेरे, ठाण्यातून राजन विचारे, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर यांच्या उमेदवारांची घोषणा उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून केली. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भोरच्या जाहीर सभेत बारामतीमधून सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर केली.