वाढदिवसावेळी,त्याच्या तोंडात पिस्तुल टाकून का गोळ्या झाडल्या ?
बिहारच्या दरभंगामध्ये मखनाहा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. व्हिडीओ शूट करणाऱ्या कॅमेरामनच्या कॅमेऱ्याची बॅटरी डिस्चार्ज झाल्याने संतापलेल्या आयोजकाने त्याच्या तोंडात पिस्तुल टाकून गोळ्या झाडल्या.या घटनेत व्हिडीओग्राफरचा मृत्यू झाला आहे.
दरभंगाच्या बहेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मखनाहा गावात बुधवारी रात्री वाढदिवसाची एक पार्टी आयोजित केली होती. मात्र मध्येच कॅमेऱ्याची बॅटरी लो झाल्याने संतापलेल्या आयोजकाने तोंडामध्ये पिस्तुल टाकून कॅमेरामनचा खून केला. सुरुवातीला आरोपींनी जखमीला रुग्णालयाच्या गेटवर सोडून पोबारा केला. जेव्हा त्याचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी या प्रकरणी चिलहां गावातल्या एका स्कॉर्पिओ चालकाला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरु असून इतर आरोपी फरार आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दारुच्या धंद्यात अडकलेला राकेश सहनी याच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी बुधवारी रात्री आयोजित करण्यात आलेली होती. पँडलमध्ये बारबालांचा डान्स सुरु होता. त्याच्या व्हिडीओग्राफीसाठी सुशीलकुमार सहनी याला बोलावलं होतं.
मध्यरात्री साधारण १२ वाजता सुशीलकुमारच्या कॅमेऱ्याची बॅटरी डिस्चार्ज झाली. बॅटरी चार्ज करण्यासाठी सुशीलकुमार घरी गेला. त्यामुळे राकेश सहनी नाराज झाला. त्याने फोन करुन सुशीलकुमारला बोलावलं आणि व्हिडीओग्राफी सोडून घरी गेल्यामुळे शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने विरोध केल्यानंतर राकेश, कन्हैया सहनी, अरुण सहनी, मनीष सहनी आदींनी सुशीलकुमारला मारहाण केली. त्यानंतर राकेशने सुशीलच्या तोंडात पिस्तुल टाकून त्याच्यावर गोळी झाडली.
याप्रकरणी बहेरी ठाण्याचे प्रमुख वरुण कुमार गोस्वामी यांनी सांगितलं की, फरार झालेल्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. मुख्य आरोपी दारुविक्रेता असून त्याची चौकशी सुरु आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.