जरांगे पाटील शरद पवारांचा बाप झालाय, प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. परभणीतील ओबीसी भटके विमुक्त यांच्या एल्गार सभेत बोलताना आंबेडकर यांनी, “इतिहासात फार जणांना संधी मिळत नाही, मोजक्या लोकांना संधी मिळते.
मनोज जरांगे पाटील यांना इतिहासात नाव कोरण्याची संधी आहे. 6 महिन्यांपूर्वी जरांगे पाटील कोण होते हे कोणालाही माहिती नव्हते. पण हा सामान्यातला सामान्य माणूस आज शरद पवारांचा बाप झालाय.” असं म्हटले आहे.
परभणीत ओबीसी आणि भटके विमुक्त जमातीच्या एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होत. नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे, शरद पवार आणि भाजपवर हल्लाबोल केला. मराठा आरक्षणासाठी ओबीसी लढायला तयार आहे. परंतु स्वतंत्र मराठा आरक्षणासाठी आम्ही लढू. आमच्या ताटातून आरक्षण देणार नाही असं आंबेडकर यांनी सांगितले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगेंना सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, ‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा ओबीसीही लढतील, पण ओबीसींची अट तुम्ही मान्य केली पाहिजे. अट अशी आहे की, आमचं ताट आम्हाला राहू द्या. आपण वेगळं ताट काढू. त्यामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण देऊ.’
मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. ते आता राज्याचा दौरा करणार आहेत. तसेच आंतरवालीत साखळी उपोषण करणार आहेत. त्यांच्या या उपोषणाला पुन्हा एकदा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे अडचणीत
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या विरोधात बीड जिल्ह्यात 2 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तर शिरुर आणि अमळनेर येथेही मनोज जरांगे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल झाल्या आहेत. मराठा आंदोलनादरम्यान मराठा समाज बांधवांना चक्का जाम करणे, रास्ता रोको आंदोलन करण्यास चिथावल्याचा मनोज जरांगे पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.