मराठा आरक्षण २४ फेब्रुवारीरोजी ११ ते १ पर्यंत एकच दिवस रास्ता रोको करून ग्राम पंचायतीसमोर किंवा मंदिरासमोर २८ फेब्रुवारीपर्यंत दररोज धरणे आंदोलन करावे
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २४ फेब्रुवारी पासून सलग पाच दिवस होणार असलेला रस्ता रोको आंदोलनाचा निर्णय मागे घेतला आहे. परीक्षेचा आणि लग्नसराईचा कालावधी असल्याने सर्व धर्मीय समाज बांधवांनी याबाबतच्या अडचणी सांगितल्याने हा बदल केल्याचे जरांगे यांनी सांगितले.
२४ फेब्रुवारीरोजी ११ ते १ पर्यंत एकच दिवस रास्ता रोको करून ग्राम पंचायतीसमोर किंवा मंदिरासमोर २८ फेब्रुवारीपर्यंत दररोज धरणे आंदोलन करावे, असे त्यांनी सांगितले.
३ मार्चला रास्ता रोको आंदोलन होणार आहे. धरणे आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदन द्यावे. ९ ते १० नंतर निवेदन स्वीकारण्यासाठी कुणी आले नाही, तर रास्ता रोको करावा. सरकार व प्रशासनाच्या वतीने कुणी निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाही, तर याला प्रशासन जबाबदार राहील असे त्यांनी सांगितले. रविवारी (दि. २५) १२ वाजता अंतरवालीत बैठक घेवून याबाबत निर्णय घेवू, असे जरांगे यांनी सांगितले.
आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. तुमची जबाबदारी न्यायालयावर ढकलून चालणार नाही. न्यायालयाने सरकारला सुद्धा सुनावले पाहिजे. न्यायालयाने सरकारला सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याचे सांगावे.
आम्ही अर्ध्या तासात आंदोलन मागे घेवू. मी ऐकत नसल्याने सरकारने मला बदनाम करण्याचे ठरवले आहे. मला बदनाम करणारे लोक सरकारने शोधून आणले आहेत. त्यांची हिस्ट्री मला माहीत आहे.
मराठयांच्या मुलांनीच मराठ्यांच्या आईबहिणीचे डोके फोडले, असा आरोप करणे मोठे षड्यंत्र आहे. थोड्या दिवसांसाठी तू मंत्री आहेस. तुझी सर्व अंडी पिल्ली बाहेर काढील, असा इशारा नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जरांगे यांनी दिला.
छगन भुजबळ यांच्यावर टीका
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आरक्षण मिळाले आता आंदोलनाचे कारण काय यावर मनोज जरांगे म्हणाले की, तू कोण विचारणार आंदोलनाचे कारण काय? आम्हाला आंदोलनाचा अधिकार नाही का? आम्ही दर दिवस शांततेत आंदोलन करून निवेदन देऊ शकतो. आम्ही परीक्षा पुढे ढकला, असे म्हणालो नाही, तुझ्या ऐकण्यात फरक झाला, आऊट झाला आहेस तू ,असे जरांगे म्हणाले.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आरक्षण दिले, आता आंदोलकांनी जनतेला त्रास देवू नये, यावर ते म्हणाले की, जनतेला त्रास होणार नाही, तर तुम्हाला त्रास होणार आहे. अंमलबावणी करा. जिम्मेदारी तुमची आहे ती स्वीकारा. न्यायालयाला पुढे करू नका, असे जरांगे म्हणाले.
चंद्रकांत पाटील वक्तव्य..
सगळे सोयरे अध्यादेशाच्या बाबतीत जरांगे यांनी चर्चा करावी, असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले यावर जरांगे म्हणाले की, चर्चेला या तुम्हाला आव्हान आहे. तुमची आम्ही वाट पाहत आहोत. १ मार्चला ज्येष्ठांचे उपोषण आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या. फक्त निवडणुकीवेळीच आशीर्वाद घेणार का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
वड्डेटीवार यांच्यावर टीका
राहुल गांधी यांनी सांगितले वाटते, मराठ्यांच्या विरोधात बोलायला. याला राहुल गांधींनी मराठ्यांच्या नादी लागायला सांगितले का? मराठ्यांचा दम बघायचा का? तू काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहेस का? असा सवाल जरांगे यांनी केला.