कल्याण रेल्वे स्टेशनवर बेवारस बॅग मध्ये आढळली स्फोटके!
डोंबिवली – कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 येथे एक बेवारस बॅग मध्ये डिटोनेटर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलीस, विशेष तपास पथक व डॉग स्कॉड तात्काळ घटनास्थळी दाखल झाले
सदर बॅग मध्ये 54 डिटोनेटर आढळून आले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली आहे. हे येथे कोणी कशासाठी आणून ठेवले याचा तपास पोलिसांनी सुरू केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 जवळील कँटीन जवळील झाडाच्या जवळ एक बेवारस बॅग बुधवारी आढळून आली.
11 ते 11.30 च्या सुमारास सफाई कर्मचारी हे आपले काम करत असताना त्यांना झाडाखाली एक बॅग दिसली. त्यांनी त्याची पाहणी केली असता त्यात संशयास्पद वस्तू आढळून आल्याने त्याने याची माहिती तात्काळ रेल्वे पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी विशेष तपास पथक, डॉग स्कॉड, बॉम्ब शोधक नाशक पथक देखील तेथे पोहोचले. सध्या हे स्फोटक पोलिसांनी हस्तगत केले आहे. याविषयी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम साईडला 54 इलेक्ट्रिक डिटोनेटर मिळाले आहेत. विहीर किंवा खदानी अशा ठिकाणी जे जिलेटिन वापरतात
ब्लास्टसाठी ते हे असल्याचे प्राथमिक तपासात तस आपण म्हणू शकतो. सफाई कामगाराच्या मार्फत आम्हाला ही माहिती मिळाली. त्यानुसार तपास केला असता त्या ठिकाणी बॅग आढळून आली.
हे फक्त डीटोनेटर आहे. त्याचा स्फोट होण्याची शक्यता नाही मार्केटमध्ये हे सहज उपलब्ध होतात. या घटनेची कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास सुरू केला आहे. हे येथे कोणी कशासाठी आणले याचा देखील तपास सुरू आहे