“जरांगे-पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं, तर भयंकर.”, – प्रकाश आंबेडकरांचं
सगेसोयऱ्याची अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी मनोज जरांगे-पाटील 10 फेब्रुवारीपासून उपोषण करत आहेत. राज्य सरकारनं 20 फेब्रुवारीला बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी मोठं विधान केलं आहे. “जरांगे-पाटील यांचं आंदोलन यशस्वी झालं, तर सत्ता आणि राजकारणातील उलथापालथ ही भयंकर असेल,” असा दावा आंबेडकरांनी केला आहे. ते वर्ध्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
मनोज जरांगे-पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगत प्रकाश आंबेडकरांनी सतर्क केलं होतं. याकडे प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं लक्ष वेधल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “एवढी वर्षे चळवळीचा अनुभव आहे. जरांगे-पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं, तर सत्ता आणि राजकारणातील उलथापालथ ही भयंकर असेल. ही उलथापालथ न होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तो प्रयत्न होऊ नये म्हणून त्यांची औषधे, जेवण आणि पाण्यावर सरकारनं लक्ष द्यावं.”
“बरेचजण अपघातात गेली, अचानकपणे मृत्यू झाल्याचं देशात घडलं आहे. त्यामुळे सरकारला मी सतर्क केलं आहे,” असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
“ओबीसीचं ताट वेगळं पाहिजे. गरीब मराठ्यांचं नव्यानं निर्माण करण्यात येत असलेले ताट वेगळं पाहिजे. ते जर केलं, तर महाराष्ट्रात शांतात राहिल. विशेष अधिवेशनात सरकारची हीच भूमिका पाहिजे,” अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली.