सिंहाचं नाव अकबर तर सिहिंणीचं सीता! दोघांना एकत्र ठेवण्यावर आक्षेप; प्रकरण पोहचलं हायकोर्टात
कलकत्ता हायकोर्टात मंगळवारी (२० फेब्रुवारी) रोजी विश्व हिंदू परिषदेच्या बंगालच्या शाखेने दाखल केलेल्या सिंह आणि सिंहिणीच्या नावांशी संबंधित याचिकेवर सुनावणी होणार आहे.
सिलीगुडीच्या सफारी पार्कमध्ये अकबर नावाच्या सिंहाला सीता नावाच्या सिंहिणीसोबत ठेवल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या वन विभागाला आव्हान देण्यात आलं आहे.
लाइव्ह लॉच्या रिपोर्टनुसार १६ फेब्रुवारी रोजी हे प्रकरण जस्टिस सौगत भट्टाचार्य यांच्या पीठासमोर मांडण्यात आले होते. या प्रकरणात राज्य वन विभागाचे अधिकारी आणि सफारी पार्कचे डायरेक्टर यांना पक्षकार बनवण्यात आले आहे.
रिपोर्टनुसार, सिंह आणि सिंहिणीला नुकतेच त्रिपुरातील सिपाहिजाला प्राणी उद्यानातून आणण्यात आले होते. यावेळी सिंह आणि सिंहिणीची नावे बदलली नसल्याचा दावा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच सफारी पार्कमध्ये येण्यापूर्वी ही नावे दोन्ही प्राण्यांना देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
हा संपूर्ण वाद अकबर आणि सीता या नावांमुळे सुरू झाला आहे. रामायणानुसार सीता या भगवान प्रभू श्रीरामाची पत्नी होत्या. तर अकबर हा भारतातील मुघल साम्राज्याचा मुस्लिम राजा होता. या सिंह आणि सिंहिणीचे नामकरण राज्याच्या वनविभागाने केल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे.
विहिंपची नाव बदलण्याची विनंती
सीता नावाच्या सिंहिणीला अकबर नावाच्या सिंहासोबत सफारी पार्कमध्ये ठेवणे हा हिंदू धर्माचा अपमान ठरेल आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील, असा दावा विश्व हिंदू परिषदेने आपल्या याचिकेत केला आहे. सिंहीणीचे नाव बदलण्याची विनंती त्यांनी केली आहे.
विहिंपचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटले आहे की, बंगाल सफारी पार्क, सिलीगुडीमध्ये प्रजननासाठी आणले आहे. सिंह आणि सिंहिणींची नावे अकबर आणि सीता आहेत. अखेर ही कोणाची डोक्यातून आलेली कल्पन आहे, याचा तपास व्हायला हवा. तसेच त्यांची नावेही तात्काळ बदलण्यात यावीत आणि हिंदू लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी माफी मागावी, असेही म्हटले आहे.