गायीच्या दुधाचा हमीभाव ४५ रुपये, तर म्हशीच्या दुधाचा ५५ रुपये, १ एप्रिलपासून
महाराष्ट्रात दुधाचा हमीभाव आणि त्यानंतर अनेक निकषांवर दिल्या जाणाऱ्या प्रति लिटर अनुदानामुळे येथील पशुपालकांमध्ये नाराजी आहे. मात्र हिमाचल प्रदेशातील (Himachal MSP) दुध उत्पादक शेतकरी सध्या आनंदी असून तेथील सरकारने दुध उत्पादकांचा हमीभाव वाढवून दिलेला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये आता गाईच्या दुधाचा हमी भाव ३८ रुपयांवरून ४५ रुपये प्रति लिटर, तर म्हशीच्या दुधाचा एमएसपी ३८ रुपयांवरून ५५ रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. नवा वाढलेला हमीभाव येत्या १ एप्रिल २४ पासून लागू होईल.
दुधावरील हमीभाव वाढवण्याच्या निर्णयामुळे शेतकरी व पशुपालक यांची आर्थिक स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. अलीकडे चारा व पशुखाद्याच्या वाढत्या किमतींमुळे जनावरांच्या देखभाल खर्चात वाढ होत होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून दुधाला कमी दर मिळाल्याने दूध उत्पादक चिंतेत होते. मात्र आता हमीभाव वाढवून दिल्याने त्यांच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. हमीभावाा हा निर्णय हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांचा आहे.
महाराष्ट्रात काय आहे स्थिती
राज्यात गाईच्या दुधासाठी ३५ फॅट आणि ८.५ एनएसएफसाठी किमान ३४ रुपये १० पैसे प्रति लिटर हमीभाव नक्की केला होता. मात्र मागील तीन चार महिन्यांपासून दूध संघांकडून पशुपालकांना प्रति लिटर केवळ २७ ते २८ रुपये दिले जात असत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र राज्य सरकारने ही नाराजी दूर करण्यासाठी अलिकडेच ५ जानेवारी रोजी गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र पशुधनाला टॅगींग व ऑनलाईन नोंदणीची अट त्यासाठी ठेवण्यात आली आहे.