मराठा समाज आक्रमक; एसटी सेवा बंद, ठिकठिकाणी रास्ता रोको..
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलनाला सुरूवात केली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेण्यास सुरूवात केली.
राज्यात अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आला आहे. तसेच सलग दुसऱ्या दिवशी देखील एसटी बससेवा ठप्प आहेत.
पुणे आणि साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प
पुणे मार्गावर वाखरी येथे मराठा समाज बांधवांनी सुमारे तासभर रास्तारोको आंदोलन केलं आहे. आंदोलनामुळे पुणे आणि साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. सलग दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरू असल्याने सामान्य नागरिकांना याचा फटका बसतोय.
विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर गोपाळपूर येथे मराठा समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय. तसेच शेगाव दुमाला व परिसरातील मराठा समाजाने पंढरपूर- सोलापूर महामार्ग रोखून धरला.
पंढरपूर -टेंभूर्णी या मार्गावर देखील आंदोलन करण्यात आले. पंढरपूर शहराकडे येणाऱ्या सहा प्रमुख मार्गावर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. एकाच वेळी प्रमुख महामार्गावर रास्तारोको तसेच चक्काचाम आंदोलन सुरू असल्यामुळे प्रवाशांबरोबरच माघी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची मोठी तारांबळ उडाली आहे.
नाशिकमध्ये आंदोलन
मराठा आरक्षणामुळे नाशिकमधील वातावरणही तापलं आहे. सकल मराठा समाजाचे नाशिकमध्ये आंदोलन केलंय. आडगावजवळ मुंबई आग्रा महामार्ग रोखण्यात आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने हा रास्ता रोको केलाय.
नांदेड – हिंगोली सिमेवर चक्काजाम
मराठा आरक्षणासाठी नांदेड – हिंगोली जिल्ह्याच्या सिमेवर रात्री आणि सलग दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरू आहे. नांदेड – हिंगोली महामार्गावरील निळा रोड फाटा येथे मराठा आंदोलकानी चक्का जाम आंदोलन सूरु केलंय. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील किमान दहा गावातील नागरिक इथे जमा झालेत. सकाळपासून येथे आंदोलन सुरूच आहे.