शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीची सुरक्षा वाढविली; इंटरनेट सेवा बंद !
नवी दिल्ली : शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. यामुळे दिल्लीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून हरियाणाची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीकडे येत आहेत.
यामुळे राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी वर्षभर ऐतिहासिक आंदोलन करत केंद्र सरकारला तीन कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडले होते. 2020-2021 या कालावधीत झालेल्या शेतकरी आंदोलाची चर्चा जगभर झाली होती.
आता पुन्हा आपल्या शेतमालाला आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देण्याचा कायदा करावा, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी मंगळवारी (ता. 13) दिल्लीत धडकणार आहेत.
संयुक्त शेतकरी मोर्चासह तब्बल 200 शेतकरी संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून केंद्रीय निमलष्कर दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना त्यांच्याच राज्यात रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात येत असल्याचा आरोप देखील शेतकरी नेत्यांनी केला आहे.
2020-2021 मध्ये दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनामध्ये पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
या आंदोलनासाठी देखील या राज्यांमधून जोरदार तयारी करण्यात येत आहे. सरकारने आपले उत्तर मंगळवारच्या आधी द्यावे, असे आवाहन शेतकरी संघटनांकडून करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्यांना त्यांच्याच राज्यात रोखण्यासाठी हरियाणा सरकार प्रयत्न करत आहे.