आताचे लवंडे कधी कुठे लवंडतील माहिती नाही. यांचा काही भरवसा आहे का? कोण जाईल यांच्याकडे?
नाशिक: तिकडे कोण जाईल, मुळात आताचे लवंडे कधी कुठे लवंडतील माहिती नाही. यांचा काही भरवसा आहे का? कोण जाईल यांच्याकडे? INDIA आघाडीत नितीश कुमारही होते ना, कुठे गेले? असा खोचक प्रश्न करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपण मविआत (महाविकास आघाडी) जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.
राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मविआत जाण्यावरून त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आज, राज ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची झाडाझडती घेत, गटतट विसरून कामाला लागण्याच्या सूचना केल्या होत्या. आजही पदाधिकारी बैठक घेणार आहेत. तसंच शिक्षक, मुख्याध्यापक, निवृत्तीनाथ मंदिर पदाधिकारी अशा विविध क्षेत्रांतील सदस्यांशी राज ठाकरे चर्चा करणार आहेत.
काय म्हणाले राज ठाकरे?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली, शिर्डी, नगरचे पदाधिकारी येऊन गेलेत. पुढे ठरवू काय करणार अजून वेळ आहे. सर्व जागा लढवाव्या अशी मागणी पक्षातून होते आहे. कुठे का निवडणूक लढवावी याबाबत चाचपणी करत आहोत. सत्ताधारी पक्षही चाचपणी करत आहेत, आम्हीही करतोय.
मी अयोध्येत जाणार आहे, गर्दी कमी झाल्यानंतर मी जाईन. अनेकवेळा मी तुम्हाला न सांगता गेलो आहे. काळाराम मंदिरातही दर्शनाला जाणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीबाबत संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर भाष्य केलं. आताचे लवंडे कुठे जातील याचा पत्ता नाही. यांच्या महाविकास आघाडीकडे कोण जाणार? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.