‘मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार ?
राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रासंबंधित अध्यादेश आणि राजपत्र जारी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. यावर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांचे अभिनंदन केले आहे.
शिंदे – फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. मराठा समाजाने खूप संघर्ष केला आणि आज त्यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
राज ठाकरे म्हणातात, ‘मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !’
तर “सगेसोयऱ्यां”साठी या नवीन शब्दाचा उल्लेख पहिल्यांदाच करण्यात आला आहे. राजपत्र आणि अध्यादेश इतक्या लवकर जारी करणे, हे इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केलं आहे. समाज म्हणून त्यांचा विरोध संपला, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली.’
सरकारने जारी केलेल्या GR नुसार, सगेसोयरे शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे. अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा आणि त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीअंतर्गत लग्न झालेल्या नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक हे “सगेसोयरे” असतील, तसेच यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल असा स्पष्ट उल्लेख GR मध्ये करण्यात आला आहे.
कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील नातेवाईक, असे अर्जदाराने शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल.