दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र कारखाना सुरू, कानपूरची नवी ओळख ..
उद्योगपती गौतम अदानी याचा व्यवसाय विविध क्षेत्रात विस्तारलेला आहे. डिफेन्स क्षेत्रातही अदानी समुहाचे नाव वाढत आहे. अशातच गौतम अदानी यांनी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र कारखाना सुरू केला आहे.
यामुळे कानपूरला नवी ओळख मिळणार आहे. आत्तापर्यंत ज्या कानपूरला ब्लॅंकेट्स आणि चामड्याच्या वस्तूंसाठी ओळखले जायचे, त्या कानपूरच्या गोळ्यांचा आवाज जगभर ऐकू येणार आहे.
अदानी समूहातील ‘अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस’ कंपनीने अलीकडेच स्वदेशी बनावटीचे ड्रोन देशाला समर्पित केले. अदानी डिफेन्सने व्हायब्रंट गुजरातमध्ये भारतीय नौदलाला ‘मेड इन इंडिया’ ड्रोन सुपूर्द केला. आता लवकरच लष्कराकडे अदानी ग्रुपने बनवलेल्या ‘बुलेट'(बंदुकीच्या गोळ्या) असणार आहेत.
अदानी बनणार ‘बुलेट किंग’
गौतम अदानी लवकरच ‘बुलेट राजा’ म्हणून ओळखले जाणार आहेत. कानपूरमध्ये त्यांच्या कंपनीने स्थापन केलेल्या शस्त्रास्त्र कारखाना सुरुवातीला 7.62 मिमी आणि 5.56 मिमी बुलेट तयार करेल. या गोळ्या जगभर असॉल्ट रायफल आणि कार्बाइनमध्ये वापरल्या जातील. या कारखान्यातून तयार होणाऱ्या बुलेटच्या निर्यातीवरही अदानी डिफेन्सचा भर राहणार आहे.
1500 कोटी रुपयांची गुंतवणूक
अदानी समूहाने या प्लांटमध्ये 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा प्लांट सुमारे 250 एकरांवर पसरलेला आहे. पुढील महिन्यात या कारखान्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे कानपूरमधील सुमारे 1500 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, संरक्षण मंत्रालयाचाही कानपूरमध्ये शस्त्रास्त्र कारखाना आहे.