मनोज जरांगेंसह मराठा आंदोलक आरक्षण मिळवण्यासाठी जाणार ‘या’ मार्गाने मुंबईत
मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मुद्यावरून चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यांनी २० जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. या उपोषणाला जाण्यासाठी त्यांनी मार्ग आणि नियोजन कशाप्रकारे असेल, याची तपशीलवार माहिती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आता देण्यात आली आहे. ते गुरुवारी म्हणजे आज (दि.२८) छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलक २० जानेवारीला सकाळी ९ वाजता मुंबईच्या दिशेने कूच करतील. जालन्यातून निघालेला मोर्चा बीडमध्ये प्रवेश केल्यानंतर गेवराई-पडळ शिंगीमार्गे अहमदनगरमध्ये पोहोचणार आहे.
अहमदनगरमधून शिरुर, शिक्रापूर, रांजणगावमार्गे मुंबई-पुणे महामार्गावर दिंडी पोहोचणार आहे. त्यानंतर लोणावळा-पनवेल-वाशी-पनवेलमार्गे मोर्चा आझाद मैदानात दाखल होणार आहे. म्हणजे हा मोर्चा जालना-बीड-अहमदनगर मार्गे पायी दिंडी मुंबईत दाखल होणार आहे. यावेळी मराठा बांधवांनी आपल्या वाहनांमध्येच जेवणाची व्यवस्था करावी. मोठ्या प्रमाणात पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका सुद्धा पायी दिंडीत सहभागी असणार आहेत. शिवाय किर्तन, भारूड ,लेझीम, यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन पायी दिंडीत केलं जाईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. एक टीम मुंबईत जाऊन आझाद मैदानाची पाहणी करणार आहे. मोर्चा शांततेत काढा. अंतरवाली ते मुंबई दरम्यान अडीच लाख स्वयंसेवक हे पायी दिंडीमध्ये असणार आहे.
“आपण शांततेच्या मार्गानं मुंबईत जाणार आहोत. आरक्षण मिळवलं नाहीतर, मराठ्यांच्या मुलांचं प्रचंड हाल होणार आहेत. त्यामुळे कुणीही घरी बसू नये. घरी राहिलो, तर आपल्या मुलांचं वाटोळ होईल. ही शेवटची लढाई आपल्याला जिंकायची आहे. आरक्षण मिळवल्याशिवाय माघारी यायचं नाही,” असा निर्धार जरांगे-पाटलांनी व्यक्त केला.