देशातील दोन कोटी महिलांना लखपती करण्याचे माझे स्वप्न आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी
भोपाळ : देशातील बचतगटांशी संबंधित दोन कोटी महिलांना लखपती बनवायचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘विकास भारत संकल्प यात्रेअंतर्गत विविध सरकारी कार्यक्रमांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान आभासी संवाद साधत होते.
मोदींनी रुबिना खान नावाच्या महिलेशी चर्चा केली. यावेळी मोदींनी महिलांना लखपती व्हायचे असल्यास हात वर करण्यास सांगितले, त्यानंतर सर्वांनी हात वर करत प्रतिसाद दिला. पंतप्रधान म्हणाले की, आमच्याकडे महिलांसाठी खूप काम आहे, अशा उपक्रमांमध्ये त्यांना पाठिंबा द्यायला हवा. त्यावर पंतप्रधानांची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सर्व जण काम करतील, असे सर्वांनी उत्तर दिले.
मोदींनाही आश्चर्य…
रुबिना म्हणाल्या की, कोरोनामध्ये मास्क, सॅनिटायझर आणि किट बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून प्रत्येक महिलेने ६० ते ७० हजार रुपयांची कमाई केली. हे ऐकून मोदींनाही आश्चर्य वाटले. पंतप्रधानांनी रुबिनाला तिच्या मुलांबद्दल विचारले, ज्यावर तिने सांगितले की तिच्या दोन मुली दहावीपर्यंत शिकल्या आहेत आणि बेरोजगार मुलासाठी कार खरेदी केल्याचेही रुबिनाने सांगितले.
माझ्याकडे सायकलही नाही…
रुबिनाने पंतप्रधानांना सांगितले की, बचत गटातून ५ हजारांचे कर्ज घेतले आणि पतीसोबत मोटरसायकलवर कपडे विकायला सुरुवात केली. जेव्हा तिचे काम वाढले तेव्हा तिने आणि तिच्या पतीने सेकंडहँड मारुती व्हॅन घेण्याचे ठरवले. यावर मोदी म्हणाले की, तुमच्याकडे मारुती व्हॅन आहे, तर माझ्याकडे सायकलही नाही. यावर महिला पुन्हा हसायला लागल्या. रुबिनाने सांगितले की, तिचा व्यवसाय वाढला असून तिने देवास येथे दुकान घेतले असून आता ती चांगले काम करत आहे.