ताज्या बातम्या

नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक,200 तरुण-तरुणी इंटरव्ह्युला आले,ऑफर लेटरही मिळाले, सकाळी ऑफिस गायब!


अहमदाबाद : देशभरात बेरोजगारीचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. नोकरी मिळवण्यासाठी युवक-युवती कठोर परिश्रम करताना दिसतात; पण गुजरातमध्ये सुमारे 200 बेरोजगारांची नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे.

फसवणूक करणाऱ्यांनी एका आलिशान इमारतीत चार दिवसांकरिता ऑफिस थाटलं. नोकरीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. नंतर त्यांच्याकडून पैसे गोळा केले गेले आणि चार दिवसानंतर संपूर्ण ऑफिसच गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोकरीसाठी फसवणूक करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असून, अधिक तपास सुरू आहे.

अहमदाबादमधला रामनगर परिसर मोठ्या इमारतींसाठी ओळखला जातो. अनेक मोठी ऑफिसेस इथं आहेत. त्यापैकी मोन्डल हाइट्स नावाच्या इमारतीतदेखील अनेक ऑफिसेस आहेत; पण त्या इमारतीतलं एक ऑफिस 200 जणांसाठी धक्कादायक ठरलं. त्या इमारतीतलं एक ऑफिस चार दिवसांत गायब झालं. खुर्च्या, टेबल, डेस्क आणि ऑफिसमधले कर्मचारी गायब झाल्याने नोकरीसाठी आलेल्यांना मोठा धक्का बसला.

एखाद्या चित्रपटासाठी सेट उभारला जातो, अगदी तसं या इमारतीत एक मोठं ऑफिस तयार केलं गेलं. नोकरीसाठी इच्छुकांना बोलावलं गेलं. सिलेक्शनच्या नावावर कोणाकडून 20 हजार, तर कोणाकडून 30 हजार रुपये घेतले गेले. चार दिवसांत या ऑफिसमध्ये 200 युवक-युवती आले आणि लाखो-कोट्यवधी रुपये गोळा करून ऑफिसमधले कर्मचारी फरार झाले. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत या प्रकरणातले सर्व पीडित पुढे आलेले नाहीत.

7 डिसेंबर रोजी अहमदाबादमधल्या हटकेश्वर इथे राहणारी देविका रमाणी (वय 23) मोन्डल हाइटमधल्या एका टेक्स्टाइल कंपनीच्या ऑफिसमध्ये गेली. ऑफिस अत्यंत सुंदर होतं. अनेक जण तिथे काम करत होते. वेगवेगळे विभाग तयार केलेले होते. देविका एक फॅशन डिझायनर आहे. ती या ठिकाणी जॉबकरिता इंटरव्ह्यू देण्याकरिता आली होती. तिच्याप्रमाणे अनेक युवक-युवतीही तिथे इंटरव्ह्यूसाठी आले होते.

थोड्या वेळाने एचआर डिपार्टमेंटच्या एका व्यक्तीने तिला ‘इंटरव्ह्यूसाठी मॅनेजरनं बोलावलं आहे’ असा निरोप दिला. देविका खूप खूश होती. अशा शानदार ऑफिसमध्ये नोकरी मिळावी अशी तिची इच्छा होती. ती आत गेली. मॅनेजरने तिला बसायला सांगितलं आणि इंटरव्ह्यू सुरू झाला. देविका प्रश्नांची समर्पक उत्तरं देत होती. मॅनेजरने थोडा वेळ इंटरव्ह्यू घेतला आणि देविकाची इच्छा पूर्ण झाली. मॅनेजरने देविकाला सिलेक्शन झाल्याचं सांगितलं.

त्यानंतर देविका एचआर डिपार्टमेंटमध्ये गेली. तिथं काही औपचारिक बाबी पूर्ण केल्या. तिला दोन दिवसांत म्हणजे सोमवारपासून कंपनी जॉइन करण्यास सांगण्यात आलं. तिला सुमारे 35 हजार रुपये पगार मिळणार होता. त्यानंतर तिच्याकडून लॅपटॉप आणि इतर लॉजिस्टिकसाठी 20,800 रुपये घेतले गेले. देविका आनंदात घरी परतली. याप्रमाणे या ऑफिसमध्ये इतरही अनेकांचे इंटरव्ह्यू झाले. या कंपनीने 200 जणांचं सिलेक्शन केलं.

सोमवारी सकाळी देविका नवीन जॉबसाठी ऑफिसमध्ये पोहोचली. इमारतीत जिथं ऑफिस होतं तिथं गेली असता, तिथं काहीच नव्हतं. ते मोठं ऑफिस अचानक गायब झालं होतं. कर्मचारी, डेस्क, खुर्च्या, टेबल आणि एचआर विभाग यांपैकी काहीच तिथे नव्हतं. आपण चुकीच्या ठिकाणी आलो असं देविकाला वाटलं. तिने इकडे-तिकडे पाहिलं तर संपूर्ण इमारतीत टेक्स्टाइल कंपनीचं ऑफिस कुठेच नव्हतं.

देविकाने या ऑफिसबाबत चौकशी केली असता, असं कोणतंही ऑफिस इथं नसल्याचं लोकांनी सांगितलं. देविकाला विश्वास बसत नव्हता. दोन दिवसांपूर्वी असलेलं एवढं ऑफिस अचानक गायब कसं होऊ शकतं, असा प्रश्न तिला सतावत होता. तिने आजूबाजूच्यांकडून माहिती मिळवली असता समजलं, की ते ऑफिस केवळ चार दिवसांकरिता उघडण्यात आलं होतं. त्यांनी केवळ चार रात्रींचं भाडं दिलं होतं. यावरून आपली फसवणूक झाल्याचं देविकाच्या लक्षात आलं. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

विधवेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button