मुख्यमंत्र्यांनी केले मोठे धक्कादायक खुलासे,ठाकरे सरकारच्या काळात इतके घोटाळे?
एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत कोरोना काळात मुंबईत झालेल्या घोटाळ्यांबद्दल सविस्तर भूमिका मांडली. एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठे आणि धक्कादायक दावे केले आहेत. संबंधित दावे ऐकल्यानंतर व्यक्ती सुन्न होईल, असे गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात मांडले.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी अनेक मोठे धक्कादायक खुलासे केले. “कोव्हीड काळात काही लोकांच्या कृपेने पैशाचा पाऊस पडला. उत्तर प्रदेशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी ही कंपनी अशी काही तळपली. स्वत:चे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ अॅटर्नी देऊन इतर कामे त्यांनी घेतली. आदित्य राजाच्या कृपेने वरूण राजाने अक्षरश: टेंडरचा पाऊस पाडला”, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.
“या प्रकरणातील महत्त्वाचं प्यादं रोमिंग छेडा आहे. या कंपनीची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून. हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला पेंग्विनसाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट दिलं. या हायवे ब्रिज बनवणाऱ्या कंपनीने पॉवर ऑफ अॅटर्नी द्वारे रोमिंग छेडाला हे काम दिलं. इथे रोमिंगचं पहिलं रोमिंग आणि रोमहर्षक प्रवास सुरू झाला. पुढील चार वर्षात रोमिंगला छोटीमोठी मिळून २७० कोटीची ५७ कंत्राटे देण्यात आली”, असा मोठा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
‘हायवे बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं टेंडर’
“हायवे बनवणाऱ्या कंपनीला पुढे ठेवून कोव्हिडच्या काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कामही दिलं. त्याचा काय संबंध? रोड बनवणारी कंपनी. आणि पेंग्विन त्यानंतर कोव्हिडचं काम दिलं. कोण आहे हा? कशासाठी दिलं? हा रोमिंग छेडा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम करत असेल अशी कुणाची समजूत होईल. बोरीवलीत त्याची परिहार डिपार्टमेंटल स्टोअर्स नावाचं कपड्याचं दुकान होतं. ही वस्तुस्थिती आहे. हे तपासात आलं”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
“कपड्याचं दुकान होतं. हायवे कंपनीला कंत्राट मिळताच दोन टक्के पैसे ठेवून सर्व पैसे रोमिंग छेडाच्या खात्यात वळवण्यात आले. पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ किती करायचा याचा विचार केला पाहिजे. एकीकडे माणसं मरत आहेत. अशा प्रकारचे काम जी मंडळी करत होती. त्यांनी थोडातरी विचार करायची गरज होती”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
‘८० कोटींचं काम दिलं’
“ऑक्सिजन प्लांटचं काम जुलैमध्ये करणे अपेक्षित असताना ते ऑक्टोबरमध्ये पूर्ण झाले. हे काम एक महिना उशिरा म्हणजे ऑगस्टमध्ये झाल्याचं दाखवून तीन कोटी दंड आकारण्यात आला. त्यातही गैरप्रकार झाला. तो तपासात आला. ऑक्टोबर महिना धरला तर तीन महिन्यासाठी नऊ कोटी रुपये दंड आकारला गेला हवा होता. फक्त तीन कोटी दंड घेतला. बोगस कागदपत्रांद्वारे काम पूर्ण झाल्याचं दाखवलं. काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्यानंतर त्याच आधारे लगेच ८० कोटीचं काम त्याला दिलं. त्यामुळे ऑगस्टमध्ये कार्यपूर्ती झाल्याचा आटापिटा याच कारणासाठी सुरू होता”, असा आरोप शिंदेंनी केला.
बापरे! रोमिंग छेडाला तब्बल इतके कंत्राटे दिली?
“रोमिंग छेडाला पेंग्विन एक्झिबिशन सेंटर बरोबरच रोबोटिक झू, फायडी थिएटर, प्रशासकीय कार्यालये, लांडगे, कोल्हे, ऑटर, तरस, बिबट्या एक्झिबिशन सेंटर पक्षांची पिंजरे आदी कामे सर्रास दिले. या बरोबरच पेंग्विन पक्षासाठी निगा आणि देखरेकीचं कंत्राटही दिलं गेलं. पेंग्विनसाठी डॉक्टर आणि मासे पुरवण्याचं कंत्राटही दिलं. एकच व्यक्ती आहे. पण सब का मालिक आहे. अनेक वेळा हे काम एक एक महिन्याचं दाखवून सातत्याने सलग त्याला दिलं”, असा दावा एकनाथ शिंदेंनी केला.
‘शाळेतील वॉटर प्युरिफायरचं कंत्राट दिलं’
“त्यानंतर या कंपनीला महापालिकेच्या शाळेतील वॉटर प्युरिफायर पुरवण्याचं कामही दिलं. पक्षी कक्षासाठी अंडरवॉटर लाईटचं कामही दिलं. झू हॉस्पिटलमध्ये हाऊसकिपिंगचं कामही दिलं गेलं. जोगेश्वरीत बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमधील कामही त्यांना दिलं गेलं. महापालिकेतील हॉस्पिटलच्या एसी यूनिटच्या देखभालीचं कामही दिलं. म्हणजे हा माणूस व्हर्सटाईल दिसतोय. मल्टिटॅलेंटेड दिसतोय. हे वाचून माझं डोकं गरगरायला लागलं. तुमचंही लागेल. ही लोकं कोणत्या थराला गेली याचा अंदाज आला पाहिजे म्हणून बोलतो. मी कधी एवढ्या डिटेल्समध्ये बोलत नाही. रोज तुम्ही आमच्यावर आरोप करता, रोज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता… म्हणून बोललो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
‘…म्हणून ब्लॅक फंगल्सचा प्रादूर्भाव झाला’
“गंजलेलं ऑक्सिजन दिल्यामुळे ब्लॅक फंगल्सचा प्रादूर्भाव झाला हे रेकॉर्डवर आलं आहे. काही लोकांचे डोळे गेले हे सुद्धा डॉक्टरने रेकॉर्डवर आणलंय. हे माझं नाही म्हणणं. काही लोकांचा जीव गेलाय. पण त्यांना काही सोयरसुतक नाही. त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे. म्हणून म्हणतो, जिथे टेंडर तिथे सरेंडर. अशा प्रकारच्या वृत्तीने काम केलं तर कसं होणार. सर्व सामान्य मुंबईकर मात्र जीव वाचवण्याची धडपड करत होता. माझे कुटुंब माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगे सोयऱ्याच्या घरी, बाकी जनतेने फिरावं दारोदारी…”, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.
‘काल्पनिक डॉक्टर दाखवले, त्यांचा पगार काढला’
“अशा प्रकारच्या वृत्तीने काम केलेली ही माणसं कशी असू शकतात? कसा मुंबईचा विकास करू शकतात? रस्ते बनविणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन प्लांटचं काम देऊन संपूर्ण आरोग्य व्यवस्थेला रस्त्यावर आणलं. लाईफ लाईन तर डेथ लाईन होती. सुधीर पाटकरच्या लाईफ लाईनला कंत्राटे दिली. काल्पनिक रुग्ण दाखवले. काल्पनिक डॉक्टर दाखवले, त्यांचा पगार काढला. रुग्णांबरोबर औषधेही वितरीत केल्याचं दाखवलं. त्यापोटी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचं काम केलं. मी स्वत:वाचलं म्हणून मी बोलत आहे. या दरोड्याच्या दौलतीतून कुणी घरे भरली हे सर्व माहीत आहे. त्यामुळे आरोप करताना विचारपूर्वक करा. नाही तर यापेक्षा अधिक गोष्टी पोतडीत आहेत”, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
“घरी बसणाऱ्यांनी देशात एक नंबरचे सीएम आहोत, असं सर्टिफिकेट मिळवलं. अरे घरी बसून एक नंबरचा सीएम कसा होऊ शकतो दादा. तो नंबर पुढून नव्हता. पाठून होता”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
“खिचडी घोटाळ्याचा पुन्हा उल्लेख करणार नाही. महापालिकेने ३३ रुपयात ३०० ग्रॅम खिचडी देण्याचं कंत्राट दिलं होत. मूळ कंत्राटदाराने सब कंत्राट दिलं. देताना मापात पाप केलं. त्याने १०० ग्रॅम खिचडीचं कंत्राट दिलं. ३०० ग्रॅम ऐवजी १०० ग्रॅम खिचडी दिली आहे. म्हणजे २०० ग्रॅमचा घास पळवून स्वत:ची तुंबडी भरली. या व्यवहारात कुणा कुणाच्या खात्यात किती पैसे गेले, चेकने पैसे गेले आहेत. ते मी सांगणार नाही. ते तपासात रेकॉर्डवर आहे. हे सर्व उघड झालं आहे. ते बाहेर येईल”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
‘खिचडीचं टेंडर भरताना पर्शियन दरबारचा पत्ता’
“सह्याद्री रिफ्रेशमेंट हे हॉस्पिटल, घोटाळ्यातील आरोपी साळुंखे, कदम, पाटकर यांच्याशी संबंधित आहे. खिचडीचं टेंडर भरताना सह्याद्रीच्या नावाने अर्ज केला. त्यावर कंपनीशी कोणताही कागदोपत्री संबंध नसलेल्या कदमची सही होती. पात्रतेसाठी ज्या किचनचा पत्ता दाखवण्यात आला, तो पत्ता गोरेगाव येथील पर्शियन दरबार हॉटेलच्या मालकाचं. खिचडीसाठी आपलं किचन दाखवण्यात आलं. हे त्या हॉटेलच्या मालकाला माहीत नव्हते. त्याने प्रतिज्ञापत्रात तसं म्हटलं होतं”, असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला.
“महापालिकेचे वैद्यकीय प्रमुख असलेले राठोड यांना भायखळ्यातील महापौर बंगल्यावर बोलावून रेमडिसीव्हीरचं कंत्राट हायट्रो लॅबला द्यायला सांगितलं. काय कारण? यासाठी युवा नेत्याचा मित्र असलेला एक पुण्यवान त्याला मदत करा असे निर्देश आले. युवा नेते पारखी असल्याने पुण्यवान माणसाला कंत्राट दिलं. ४० हजार पैकी ३१ हजार इंजेक्शन पुरवल्यानंतर मायलॉन कंपनीला दोन लाख रेमडीसीव्हरच्या इंजेक्शनचं कंत्राट दिलं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“या काळात नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या तिन्ही महापालिकेने रेमडिसीव्हर मायलॉनकडून ६५० रुपये दराने विकत घेतले. मुंबई महापपालिकेने हे इंजेक्शन १५६८ रुपयात विकत घेतले. इथेच का जास्त पैसे का घेतले? महापालिकेच्या तिजोरीवर सहा कोटीचा डल्ला मारला गेला. या पैशाचा बुस्टर डोस कुणाला मिळाला हे तपासात येणार आहे. कोव्हीडमध्ये तरी असे प्रकार व्हायला नको होती. हीच माफक अपेक्षा होती”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
दाऊदने किती लग्नं केली,कराचीत दोन ठिकाणी दाऊदचं बस्तान,कोण आहे दाऊद इब्राहिम?