मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आदेश? मुंबईत जमावबंदी..
मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी मुंबईत कलम 144 लागू केले आहे. यामुळे मुंबईकरांना कुठेही जमाव करता येणार नाही. मुंबई पोलिसांनी ही जमावबंदी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लागू केल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर विधिमंडळात मंगळवारी निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देणार, हा आपल्या शब्द असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यात येईल. यासाठी जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल. तसेच 1967 पूर्वीच्या ज्या जुन्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या रक्ताच्या नात्यातील लोकांनाही त्याचा फायदा होईल. सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले. यासह मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळात निवेदन दिल्यानंतर मराठा आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी दिलेली फेब्रुवारीची डेडलाईन फेटाळून लावत जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका घेतली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात काही दिवसांपासून सोशल मीडियावर मेसेजेस व्हायरल होत आहेत. मुंबईत मराठा आरक्षणाच्या मोर्चा काढण्यासंदर्भात हे मेसेजेस आहेत. राज्यातील सर्व मराठा बांधवांनी मुंबईतील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, या मेसेजेमधून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि मुंबई पोलिस सतर्क झाले असल्याची चर्चा आहे.
मुंबई पोलिसांनी मुंबईत किमान महिनाभर जमावबंदी लागू केली आहे. पोलिसांनी संपूर्ण मुंबईत कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू केली आहे. ही जमावबंदी 20 डिसेंबर म्हणजेच आजपासून 18 जानेवारी 2024 पर्यंत लागू असेल, असे मुंबई पोलिसांनी आदेशात नमूद केले आहे. कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
https://www.navgannews.in/crime/36733/