नर्सरी ते दुसरीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतरच भरणार
नागपूर : नर्सरी ते दुसरी इयत्तेपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतरच सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असून, शासकीय आणि खासगी शाळांना हा नियम लागू राहील, अशी माहिती या विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी शाळांच्या वेळांसंदर्भात राज्य सरकारला सूचना केली होती. ‘मुलांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ ही सातऐवजी नऊपर्यंत पुढे ढकलावी, जेणेकरून झोप पूर्ण होऊन त्यांचे शिक्षणात लक्ष लागेल. तसेच सकाळची पालकांची धावपळही कमी होईल’, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. या सूचनेची दखल घेऊन शालेय शिक्षण विभागाने नर्सरी, ज्युनियर केजी, सिनीअर केजी, इयत्ता पहिली आणि दुसरीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
याविषयी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘लहान मुलांची झोप पूर्ण होत नसल्याने त्यांच्या मेंदूमधील सिक्रेशनवर परिणाम होतो. परिणामी त्यांच्या मेंदूची वाढ खुंटते. त्यामुळे मुलांच्या शाळेची वेळ बदलण्याचा विषय आमच्या विचाराधीन होता. त्यानुसार पूर्व प्राथमिक शाळेची वेळ कोणत्याही परिस्थितीत नऊच्या आधी असू नये, असा निर्णय आम्ही घेतला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार, पूर्व प्राथमिक टप्प्यात नर्सरी, ज्युनियर केजी, सिनीअर केजी, पहिली आणि दुसरी इयत्तेचा समावेश आहे. तिसरी ते सातवी प्राथमिक आणि आठवी ते १० वीपर्यंतचा टप्पा माध्यमिक म्हणून निश्चित करण्यात आला आहे’, अशी माहिती त्यांनी दिली.
शाळांच्या वेळापत्रकासंदर्भात आम्ही एक समिती स्थापन केली आहे. त्यात मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही हा निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल. हा निर्णय नर्सरी, ज्युनियर केजी, सिनीअर केजी, इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी लागू असेल.
– दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री