वृद्धाला मोबाईलवर अश्लील फोटाे पाठविल्याचा समन्स,साधा मोबाईल. त्यात ना व्हॉट्स् ॲप, ना फेसबुक मग असे कसे झाले?
भंडारा : स्मार्ट मोबाईल फोनवर अश्लील फोटो पाठविण्याचे प्रकार नवीन नाही. अशा प्रकरणात अनेकांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र लाखांदूर येथील एका वृद्धाला मोबाईलवर अश्लील फोटाे पाठविल्याचा समन्स अमरावती जिल्ह्यातून पोस्टाने आला.
हा समन्स पाहून वृद्ध चक्रावून गेला. आपल्याकडे साधा मोबाईल. त्यात ना व्हॉट्स् ॲप, ना फेसबुक मग असे कसे झाले. त्यांनी चिंताग्रस्त अवस्थेत लाखांदूर ठाणे गाठले. सर्व प्रकार सांगितला. वृद्धाकडे पाहून त्याच्या बोलण्यावर पोलिसांचा विश्वास बसला आणि तक्रार स्वीकारली. वृद्धाचा मोबाईल कुणी तरी हॅक करून हा प्रकार केला असावा असा संशय आहे.
मनोहर वासुदेव दिवठे (६२, रा. लाखांदूर) असे वृद्धाचे नाव आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी साधा मोबाईल खरेदी केला होता. या मोबाईलमध्ये सीम कार्ड टाकून त्याच नंबरचा ते नियमित वापर करीत आहेत. सोमवारी पोस्टातून त्यांना मोबाईलवर समन्स आला. त्यात अमरावती जिल्ह्यातील एका महिलेला अश्लील फोटो पाठविल्याचा गुन्हा दाखल असल्याचे नमूद होते. हा समन्स पाहताच मनोहर अचंबित झाले. अमरावती सायबर पोलिसांनी त्या महिलेच्या तक्रारीवरून मोबाईल नंबरच्या आधारावर लोकेशन शोधले आणि विविध कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचा समन्स पाठविला.
या प्रकाराने व्यथित होत मनोहर दिवठे यांनी मंगळवारी लाखांदूर ठाणे गाठले. आलेला समन्स दाखवित आपल्याकडील मोबाईल पोलिसांपुढे ठेवला. हा प्रकार पाहून क्षणभर पोलीसही चक्रावले. काय प्रकार आहे याची शहानिशा सुरू झाली. त्यावेळी अज्ञात हॅकरने त्यांचा मोबाइल नंबर हॅक केला असावा असा कयास पुढे आला. मनोहर यांच्या मोबाईल नंबरचा वापर करून अज्ञाताने त्या महिलेला अश्लील फोटो पाठविले. हा प्रकार अमरावती जिल्ह्यातील रहाटगाव येथील महिलेसोबत घडल्याचे पुढे आले. तिने तक्रार दिली आणि इकडे मनोहर यांना समन्स आला. आता लाखांदूर ठाण्यात मनोहर दिवठे यांनीही तक्रार दिली.