मराठा आरक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विष पिऊन तरुणाची आत्महत्या
छत्रपती संभाजी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव मराठा तरुणाने आत्महत्या केली आहे.
39 वर्षीय विजय पुंडलिक राकडे या तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विष पिऊन आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये विजयने देखील सहभाग नोंदवला होता. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे विजय गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात गेला होता. यास नैराश्यात येऊन बुधवारी त्याने खामगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेतले. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने विजयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
मुख्य म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी विजयने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती या चिट्टीमध्ये त्याने आपण मराठा समाजासाठी आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. तसेच, “माझ्या मुलींना, मुलांना शिकवण्यासाठी मीपूर्णपणे कटिबद्ध असतानाही माझ्या मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात त्यांच्यासाठी मी काही करू शकत नाही. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी मी आत्महत्या करीत आहे” असा उल्लेख देखील त्याने आपल्या चिट्टीमध्ये केला आहे. दरम्यान, विजयच्या आत्महत्येमुळे गावामध्ये शोभकळा पसरली आहे. तसेच, या घटनेमुळे राज्यातील वातावरण आणखीन तापेल अशी चिन्ह निर्माण झाली आहेत.