केंद्र सरकारने पाकव्याप्त काश्मीर भारतात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा ! – उद्धव ठाकरे, शिवसेना
नागपूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या कलम ३७० वरील निर्णयाचे स्वागत केले आहे.
विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, सर्वाेच्च न्यायालयाने कलम ३७० वरील दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. आता केंद्र सरकारने पाकव्याप्त काश्मीर सप्टेंबरपर्यंत भारतात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा. असे झाले, तर तिथे एकत्रित निवडणूक घेता येईल.
उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभाग घेतला. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, देशात सध्या निश्चिती (गॅरंटी) देण्याचे काम चालू आहे. सरकार सर्वच गोष्टींची निश्चिती (गॅरंटी) देत आहे. शिवसेनेने यापूर्वी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रहित करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले होते. ‘अतिरेक्यांच्या भीतीमुळे काश्मीरमधून पलायन केलेल्या काश्मिरी पंडितांना आता काश्मीरमध्ये पुन्हा येऊन रहाता येईल का ?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.