“ओबीसींचा भावी मुख्यमंत्री..” छगन भुजबळ यांच्या बॅनर्सची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा
पुणे : राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अशात आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची इंदापूरला मोठी सभा आहे. ओबीसी एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळ पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावर भाष्य करणार आहेत.
तत्पूर्वी इंदापूरमध्ये त्यांच्या समर्थनार्थ ओबीसी कार्यकर्त्यांनी ‘भावी मुख्यमंत्री’ अशी जोरदार फ्लेक्सबाजी केल्याचे पाहायला मिळते.
आक्रमक नेते म्हणून भुजबळांची ओळख आजही राजकारणात आहे. शिवसेना पक्षात बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत भुजबळांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.त्यानंतर मंडल आयोग आणि ओबीसींच्या आरक्षनाच्या मुद्द्यावरून भुजबळांनी ठाकरेंची साथ सोडून शरद पवार यांच्यासोबत राजकीय वाटचाल सुरु केली. त्यानंतर भुजबळ राज्यासह देशभरात ओबीसींचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. अशात गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे आणि भुजबळ यांच्यात शाब्दिक फटकेबाजी सुरु असल्याचे पाहायला मिळते.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी प्रमाणपत्राचा मुद्दा समोर आणला त्यावेळी भुजबळ यांनी ओबीसींची बाजू लावून धरत पुन्हा एकदा आक्रमकपणे आपली मते मांडायला सुरुवात केली. सध्या भुजबळ ओबीसी आरक्षावरून राज्यभर सभा घेताहेत.