बायडेन यांना हरवण्यासाठी अमेरिकेतील मुस्लिम सज्ज! काय आहे कारण?
इस्राइल आणि हमास अतिरेक्यांमध्ये युद्ध सुरु आहे. युद्धाचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर पडत आहेत. युद्धामध्ये इस्राइलला स्पष्टपणे समर्थन करणे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना महागात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकी मुस्लिमांनी त्यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. बायडेन यांनी इस्राइलला जाहीर पाठिंबा दिलाय आणि त्यांना मदतही सुरु केली आहे. त्यामुळे अमेरिकेतील मुस्लिम नागरिक नाराज आहेत. त्यांनी बायडेन यांच्याविरोधात देशभर अभियान सुरु केलंय. अमेरिकेमध्ये पुढील वर्षी निवडणूक होत आहे. अशावेळी मुस्लिम समुदाय #AbandonBiden च्या बॅनरखाली एकत्र येताना दिसत आहे.
ऑक्टोंबर महिन्यापासून मुस्लिम समुदायाने अभियान सुरु केलंय. अभियान आता जोर धरु लागलं आहे. मिशिगन, एरिझोना, विस्कॉन्सिन, पेन्सेलविनिया आणि फ्लोरिडा या राज्यांमध्ये विरोधी लाट निर्माण होताना दिसत आहे. अमेरिकेमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. प्रसिद्धी कमी होत चाललेल्या बायडेन यांच्यासाठी हे नवे संकट मोठे नुकसानीचे ठरु शकतं.
जो बायडेन यांना पर्याय कोण?
काऊंसिल ऑन अमेरिकेन इस्लामिक रिलेशन (CAIR) यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे माजी प्रोफेसर आणि ब्लॅक फिलॉसोफर कॉर्नल वेस्ट निवडणूक लढवत आहेत. त्यांनी गाझामधील हल्ल्यावर टीका केली होती. तसेच युद्धविराम करण्याचे आवाहन केले होते. जिल स्टेन यांचीही अशीच भूमिका आहे. त्यामुळे मुस्लिम समूदाय त्यांना पसंदी देऊ शकतो.
अमेरिकेत निवडणुकीत केवळ दोन पक्ष मैदानात असतात. रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक अशी दोन पक्ष पद्धत देशात आहे. कोणीही सत्तेत आलं तरी त्यांना इस्राइलची बाजू घ्यावी लागते. रिपब्लिकन पक्ष देखील इस्राइलला पाठिंबा देतो. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मुस्लिम समुदायाच्या वाढीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी अमेरिकेचे आयुक्तालय जेरुसलमध्ये हलवले होते.
मुस्लिम मतदारांमुळे काय फरक पडेल?
मुस्लिम मतदार दूर गेल्यानं बायडेन यांच्या उमेदवारीवर किती प्रभाव टाकेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण, २०२० च्या निवडणुकीत बायडेन यांना खूप कमी फरकाने विजय झाला होता. अमेरिकेत मुस्लिम समूदाय ५ टक्के आहे. मुस्लिम समूदायासह ७७ टक्के बायडेन पक्षाचे डेमोक्रेटिक समर्थक देखील युद्ध विराम होण्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे बायडेन यांना पुन्हा संधी मिळेल का याबाबत सांशकता आहे.