महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार
गुहागर : पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे निखारा आहेत. या निखाऱ्याची उब घ्यायला अनेकजण दिवसा, मध्यरात्री, पहाटे भेटून जातात.
मात्र हा निखाऱ्याशी युती करण्यास कोणीही तयार नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहे. मनसेसैनिकांनी त्यासाठी तयार राहावे, असे प्रतिपादन मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केले.
चिखली कारुळ फाटा येथील शाखेचे उद्घाटन मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केले. त्यानंतर शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात मनसेचा मेळावा झाला. यावेळी पडवे गटातील सुमारे १०० पेक्षा जास्त महिलांनी मनसेमध्ये प्रवेश केला.
महाजन म्हणाले, कोकणातील वातावरण गढूळ बनले आहे. व्यावसायिकांनी मराठी पाट्या लावाव्यात असे राज ठाकरे म्हणाल्यावर टीका होते; पण यासंदर्भातील त्यांची भूमिका मराठी माणसाने समजून घेतली पाहिजे. कोकणाच्या पर्यटन विकासाबाबत मनसेची भूमिका स्पष्ट आहे. कोकणात पर्यटन उद्योगावर आधारित उद्योग यावेत.
कोकणी उत्पादनांसाठी बाजारपेठ निर्माण झाली पाहिजे. राज ठाकरे यांनी पर्यटनात्मक विकास हे ध्येय बाळगून कोकणच्या विकासाचे रणशिंग फुंकले आहे. जिल्हाचे उपाध्यक्ष विनोद जानवळकर, सरचिटणीस संतोष नलावडे, अमोल साळुंखे, महिला सेना सचिव अनामिका हळदणकर, गुहागरचे तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर उपस्थित होते.