उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधला वडा – राज ठाकरे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वडापाव महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. वडापावला पाहिल्यानंतर आपल्याला राज्यातील राजकारणाची आठवण येते.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधला वडा आहेत, असं मिश्किल वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर श्रोत्यांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी वडापावचं महत्त्व काय आहे, वडापाव विशेष का आहे, त्या विषयी भाष्य केलं. तसेच आपल्याला इच्छा असूनही इथे वडापाव खाता येणार नाही, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.
“वडापाव खातखात ही पिढी उभी राहिली. पुढची पिढीदेखील उभ्या राहत आहेत. खरंतर अशोकराव वैद्य यांचे आभार मानले पाहिजेत, त्यांनी या वडापाववर किती पिढ्या घडवल्यात, आणि किती गाड्या केल्या. ती चवच वेगळी असते. आज हा काही भाषणाचा विषय नाही. पण मला गेल्या वर्षभरापासून वडापाव पाहिला की आताच्या राज्यातील सरकारची आठवण येते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वडा अजित पवार आहे की, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधला वडा एकनाथ शिंदे आहे? की वाईस वर्सा जे काय असेल ते”, असा मिश्किल टोला राज ठाकरे यांनी लगावला.
‘मला वडापाव खायचाय, पण…’
“इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टॉल लागलेले आहेत. मला इथे वडापाव खाता येणार नाही. इच्छा असूनसुद्धा मला वडापाव खाता येणार नाही. खरंतर मला वडापाव खायचाय. पण हे (मीडिया कॅमेरामन) सोडत नाहीत. कारण दुसऱ्या दिवशी ऑ… सारखे फोटो येतात. त्यामुळे या भानगडीतच न पडलेलं बरं. मी यांना सांगितलंय की मला पार्सल द्या. घरी जावून खाईन”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
राज ठाकरेंनी किस्सा सांगितला
“तुम्ही वडापाव चवीने खात आहात, वजन वाढत आहे, हे आपले आहेत तिथेच. पण आता मला बरं वाटलं की, ज्या अशोक वैद्यांनी वडापाव ही संकल्पना आणली, ही अशी माणसं आहेत ज्यांना महाराष्ट्र भूषण दिलं पाहिजे. वडापाव आज सर्वीकडे पोहोचलाय”, असं राज ठाकरे म्हणाले.
“दोन मराठी मुलं माझ्याकडे आले, दहा वर्ष झाले असतील, मला म्हणाले की, आज सकाळी बाळासाहेबांना भेटलो, तुम्हाला भेटायची इच्छा होती, तुम्ही आम्हाला भेटलात, आज संध्याकाळच्या फ्लाईटने लंडनला चाललोय. मी म्हटलं लंडनला का चाललात? ते म्हणाले, आम्ही लंडनला वडापाव सुरु करतोय. मी तिथे एक दिवस जाऊन आलो. वडापाव खायला गोऱ्या लोकांची प्रचंड गर्दी होती. खरंतर त्यांना तिखट मानवत नाही. पण बरीच गर्दी होती. आमच्या अशोक वैद्यांनी सुरु केलेला एक वडापाव लंडनमध्ये खातात, पण आम्हाला कौतुक मॅकडोनल्डचं. आमच्या वडापावचं नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.