वारंवार होणारी छेडछाड व बदनामीच्या धमकीला कंटाळून मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या
पुणे : वारंवार होणारी छेडछाड व बदनामीच्या धमकीला कंटाळून अल्पवयीन १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बारामती तालुक्यातील शिवपुरी (सोनकसवाडी) येथे २८ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार लक्ष्मण महानवर, लक्ष्मण बाबा महानवर, सिंधुबाई लक्ष्मण महानवर, नवनाथ दादा महानवर सर्व (रा. शिवपुरी, सोनकसवाडी, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी तुषार महानवर हा फिर्यादीच्या मुलीला १ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबरपर्यंत वेळोवेळी त्रास देत होता. तसेच त्याने २७ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता फिर्यादीच्या घरात येऊन छेडछाड करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मात्र, आरोपींनी तुषार यास समजावून सांगण्याऐवजी फिर्यादीच्या मुलीचीच बदनामी करू अशी धमकी दिली. त्यामुळे मुलीने घराच्या पत्र्याच्या खोलीत लोखंडी चॅनलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक तुषार भोर करीत आहेत. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबाने केली आहे.