गृहमंत्र्यांच्या भाचाच्या दुकानात करोडोंची चोरी;पोलिसांवरच गोळीबार
मध्य प्रदेशमध्ये चक्क माजी गृहमंत्र्यांच्या भाच्च्याच्या दुकानातच चोरीची घटना घडली. गृहमंत्री हिंमत कोठारी यांचा भाच्चा प्रकाश कोठारी याचं सोन्याचं दुकान आहे. या ज्वेलरी शॉपमधून तब्बल साडे पाच कोटी रुपयांची चोरी करण्यात आली
चोरीच्या आरोपावरुन पोलिसांनी गुना जिल्ह्यातील पारधी समाजातील वस्त्यांवर घेराबंदी केली. रतलाम पोलिसांनी धरनावदा पोलीस ठाणे हद्दीतील खेजडा चक गावात घेराबंदी करत काहींची धरपकड सुरू केली.
पोलिसांनी वस्त्यांना घेरून धरपकड सुरू केल्याने पारधी समाजही आक्रमक झाला होता. त्यावेळी, वस्तीवरील लोकांनी पोलिसांवरच फायरींग सुरू केले. रायफल, पिस्टल, १२ नोक बंदूक, देसी कट्टे वापरुन या बदमाशांनी पोलिसांवर गोळीबार केला. गोळीबार करतच ते जंगलाच्या दिशेने पळून गेले. याप्रकरणी, आरोपींच्या हल्ल्यातून बचावलेल्या पोलिसांनी घरनावदा पोलीस ठाण्यात FIR दाखल केलं आहे.
जावरा येथील कोठारी ज्वेलर्सवर १६ सप्टेंबरच्या पहाटे साधारण ४ ते ५ वाजताच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारला. या घटनेत ५.५० कोटींच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी हे सराईत गुन्हेगार असून पारधी गँगशी निगडीत असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्याआधारे पोलिसांनी, गंगाराम उर्फ गंगू, पवन पारधी, कालिया पारधी, मुरारी पारधी यांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी या चोरीसाठी पोलीस वाहनाचा वापर केला होता. गुना येथून याच कारने त्यांनी रतलाम गाठले होते.
दरम्यान, आरोपींविरुद्ध कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.