भारताकडे येणाऱ्या कार्गो जहाजाचे अतिरेक्यांनी केले अपहरण,जहाजामध्ये विविध देशाचे ५० क्रू मेंबर
तुर्कस्तानकडून भारताकडे येणाऱ्या एका मालवाहतूक जहाजाचे येमनच्या हुथी बंडखोरांनी अपहरण केले आहे. जहाजामध्ये विविध देशाचे ५० क्रू मेंबर असल्याचं सांगितलं जात आहे. लाल समुद्रात असताना या जहाजाचे अपहरण झाले आहे.
इस्राइली लष्कराने ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. येमनच्या लाल समद्रापाशी हुथी बंडखोरांनी एका मालवाहतूक जहाजाचे अपहरण केले. हा प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत गंभीर आहे. जहाज तुर्कस्तानमधून भारताकडे निघाले होते. यामध्ये विविध देशांचे स्टाफ सदस्य आहेत. यात कोणी इस्राइली नागरिक नसून जहाज देखील इस्राइलचे नाही, असं लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
इस्राइलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून याप्रकरणी ट्विट करण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय जहाजावर केलेल्या इराणच्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. जहाजाची मालकी ब्रिटिश कंपनीची असून त्याला जपानची फर्म चावलते. इराणच्या मार्गदर्शनानुसार येमेनच्या हुथी अतिरेक्यांनी या जहाजाचे अपहरण केले आहे, असं त्यात म्हणण्यात आलंय.
हुथी बंडखोरांनी इस्राइली जहाजांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. इस्राइलच्या मालकीच्या किंवा त्यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करण्यात येईल असं हुथीने म्हटलं होतं. दरम्यान, हुथी बंडखोरांना इराणकडून खतपाणी घातले जाते. इस्राइलवर हल्ले करण्यासाठी त्यांना सर्व प्रकारची मदत इराणकडून होत आहे.