मराठ्यांच्या स्वतंत्र आरक्षणास विरोध नाही – विजय वडेट्टीवार
बारामती : मराठा आरक्षण ओबीसींच्या वाट्यातून घ्यायचा विषय नाही, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याला कोणाचा विरोध नाही, अशी चर्चा बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत झाली, अशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
पवारांसोबत झालेल्या अन्य चर्चेचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. सगळ्याच गोष्टी सांगितल्या तर ‘प्लॅनिंग’ काय राहिले, असे ते म्हणाले. बारामतीत पत्रकारांशी ते बोलत होते.
ओबीसी मेळाव्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ओबीसी मेळाव्यासंबंधी आता मी बोलणार नाही. मी तिथे माझी भूमिका मांडली आहे. पुरोगामी महाराष्ट्र अशी राज्याची ओळख आहे. इथे जाती-धर्मावरून कधीही दूषित वातावरण निर्माण झालेले नाही. अशा परिस्थितीत राज्याच्या इतिहासाला कलंक लागेल, समाजात दरी निर्माण होईल असे कोणी वागू नये. कोणी घटनात्मकरीत्या हक्क मागत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. सरकारने घटनेच्या चौकटीत बसवून त्यांची मागणी पूर्ण करावी. पवार यांच्यासोबतच्या चर्चेतही हा विषय झाला. ओबीसींच्या वाट्यातून आरक्षण द्यायचा विषय नाही.
मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याला कोणाचा विरोध नाही. या स्थितीत कोणी आगीत तेल ओतत असेल तर त्यांनी ते बंद करून राज्याची मान व शान राखावी. राज्यात 29 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, ते ओबीसीत येणार का, या प्रश्नावर थेट उत्तर देणे वडेट्टीवार यांनी टाळले. ते बघता येईल असे सांगून ते म्हणाले, सत्तेतील काही लोक एक बाजू सांभाळत आहेत तर काही लोक दुसरी बाजू सांभाळत पत सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. मी यापूर्वीच 28 लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले असल्याचे सांगितले आहे. आता त्यांना ओबीसीत घेणार का, संख्या किती होईल असे प्रश्न आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुचविल्याप्रमाणे, जातनिहाय जणगणना हाच त्यावरील मार्ग आहे. संख्या निश्चित करून ज्याचा वाटा त्याला द्यावा, असे माझे मत असल्याचे ते म्हणाले.