धनगर आरक्षणासाठी सुप्रिया सुळेंनी लावला मुख्यमंत्री शिंदेंना फोन
बारामतीः धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. याबाबत मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र व दिल्ली स्तरावर सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.
बारामतीत धनगर आरक्षणाच्या मुद्यावर चंद्रकांत वाघमोडे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात व्हावा या मुख्य मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने राज्यस्तरीय आंदोलन सुरु आहे. चंद्रकांत वाघमोडे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता.
खासदार सुप्रिया सुळे यांनी संध्याकाळी उपोषणस्थळी येत चंद्रकांत वाघमोडे व धनगर समाज बांधवांशी चर्चा केली. इतक्या वर्ष धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्याबद्दल सर्वांनीच संतप्त भावना व्यक्त केल्या. सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्याशी चर्चा केली.
मुख्यमंत्री बैठकीत असल्याने गगराणी यांनी सुळे यांचा निरोप मुख्यमंत्र्यांना देतो असे सांगितले. त्या पाठोपाठ सुळे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांनाही फोन लावून धनगर समाजाच्या तीव्र भावना त्यांच्या कानावर घातल्या. मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलण्याची विनंती त्यांनी केली. सरकारच्या प्रतिनिधीने चंद्रकांत वाघमोडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी यायला हवे या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलू असेही त्या म्हणाल्या.
दुसरीकडे महाराष्ट्राच्या स्तरावर मुख्यमंत्री व दिल्ली स्तरावर केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्यासमवेत बैठक घडवून धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्याचीही ग्वाही सुप्रिया सुळे यांनी या वेळी दिली.
याच वेळेस खासदार श्रीरंग बारणे यांनी एका खाजगी विधेयकामध्ये धनगर आरक्षणाबाबत उपयुक्त सूचना केल्याचे एका नेत्याने सांगितल्या नंतर सुळे यांनी तातडीने श्रीरंग बारणे यांना फोन लावून त्यांनाही या बाबत या विधेयकाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले.
दोन दिवस उपोषण थांबवावे, सरकारने मागणी मान्य न केल्यास पुन्हा निर्णय घेऊ शकता, अशी विनंती सुळे यांनी चंद्रकांत वाघमोडे यांना केली. मात्र सरकारच्या प्रतिनिधीने चर्चा करायला हवी अशी भूमिका वाघमोडे यांनी मांडली. पाच दिवसात कोणीही साधी भेट घ्यायला देखील न आल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.