बायको गरोदर,नवऱ्यानं केला नोकराचा का खून ?
बायको गरोदर राहिल्यानं तिच्या गर्भातील बाळ आपलं नसल्याच्या संशयातून आरोपी नवऱ्यानं नोकराचा खून केला. घटनेपूर्वी त्यानं बायकोला माहेरी पाठविलं.
तो पत्नीचीही हत्या करणार होता, मात्र त्यापूर्वीच भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली. सुरेंद्र कन्हैय्यालाल सोनकर (वय ४०, रा. कामतघर, भिवंडी) असं अटक केलेल्या नवऱ्याचं तर सद्दाम कुरेशी (वय १९) असं हत्या झालेल्या नोकराचं नाव आहे.
ठाणे : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी भिवंडी अंजुरफाटा रेल्वे स्टेशन रोड येथील रेल्वे रुळानजीक निर्जन ठिकाणी एका झाडाला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लटकलेला आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी पंचनामा करत सद्दामचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करुन नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा स्थानिक पोलीस पथक आणि भिवंडी गुन्हे शाखेचं पथक समांतर तपास करत होतं. दरम्यान मृताची ओळख पटवण्यात त्यांना यश आलं.
बायकोचे अनैतिक संबंध असल्याचा संशय : मृत सद्दाम इसहाक हुसेन आरोपी मालकाकडं टेम्पो चालक म्हणून कामाला होता आणि तो मालकाच्या घरातच राहत होता. विशेष म्हणजे, आरोपीचे यापूर्वी दोन लग्न झाले होते. मात्र, आधीच्या दोन्ही बायका सोडून गेल्यानं त्यानं याच वर्षी तिसरं लग्न केलं होतं. त्यातच त्याची तिसरी बायको गरोदर राहिल्यानं नोकर आणि आपल्या बायकोमध्ये अनैतिक संबध असल्याचा संशय आरोपी नवऱ्याला आला होता.
नोकराला मारहाण आणि हत्या : तेव्हापासून संशयाचं भूत नवऱ्याच्या मानगुटीवर बसल्यानं त्यानं नोकर सद्दामचा काटा काढण्याचा प्लॅन रचला होता. ठरलेल्या प्रमाणं आरोपीनं मृतक चालकाला ८ नोव्हेंबर रोजी भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावाच्या हद्दीत बोलवून त्याला टेम्पोमध्ये बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी मालकानं त्याचा मृतदेह ताडाली गावाच्या हद्दीत असलेल्या रेल्वे रुळानजीकच्या एका झाडाला टांगला आणि तो फरार झाला.
आरोपीला 48 तासात अटक : चालकाचा मृतदेह आढळून आलेल्या घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता आरोपी मालकाचं नाव पुढं आलं. त्यातच गरोदर असलेली तिसरी बायको उत्तर प्रदेशात माहेरी गेली असून आरोपी नवरा तिलाही मारणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यानंतर भिवंडी गुन्हे शाखेचं पथक आरोपीला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशात दाखल झालं. त्यानंतर जौनपूर येथील बक्सा पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आरोपीला भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या 48 तासात अटक केली.
आरोपी सराईत गुन्हेगार : या संदर्भात भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान आरोपी हा नोकराची हत्या करुन बायकोलाही ठार मारण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये गेल्याची माहिती मिळताच त्याला बायकोची हत्या करण्यापूर्वीच अटक केली गेली. आरोपी सुरेंद्र हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात भिवंडीसह कल्याण, नवी मुंबई या परिसरात चोरी, घरफोडी अशा 25 गुन्ह्यांची नोंद असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. अटक आरोपीला नारपोली पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी सांगितलं. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, त्याला पोलीस कोठडी सुनावली गेली. पुढील तपास नारपोली पोलीस पथक करीत आहेत.