“भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा, शक्य ती सर्व मदत करण्यास तयार”
पाळमध्ये शुक्रवारी रात्री 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने 132 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. रुकुम पश्चिम डीएसपी नामराज भट्टराई यांनी पुष्टी केली की पहाटे 5 वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) गोळा केलेल्या आकडेवारीनुसार 36 मृत्यूची नोंद झाली आहे.
जजरकोटचे डीएसपी संतोष रोक्का यांनी सांगितले की, भूकंपात 34 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर इतर ठिकाणीही माणसांचा मृत्यू झाला आहेत.
जजरकोट आणि रुकुम हे पश्चिम नेपाळमधील भूकंपग्रस्त भाग आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बाधित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आणि ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्या जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. नेपाळमधील या आपत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
Deeply saddened by loss of lives and damage due to the earthquake in Nepal. India stands in solidarity with the people of Nepal and is ready to extend all possible assistance. Our thoughts are with the bereaved families and we wish the injured a quick recovery. @cmprachanda
— Narendra Modi (@narendramodi) November 4, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “नेपाळमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीमुळे आपण अत्यंत दु:खी आहोत. भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. आमच्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत आणि आम्ही जखमींना लवकरात लवकर बरे व्हावं यासाठी प्रार्थना करतो” असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नॅशनल सेंटर फॉर सीस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी नोंदवण्यात आली आणि भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये 10 किमी आत होते. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि बिहारसह उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
नेपाळपासून दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले भूकंपाचे धक्के
नोएडा, एनसीआरमध्ये भूकंपामुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. बिहारमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर बिहारची राजधानी पाटणामध्ये लोक घराबाहेर पडले. पाटणा येथील एका व्यक्तीने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, अचानक त्याचा बेड आणि पंखा हालू लागला. भूकंप झाल्याचे लक्षात येताच ते तात्काळ घराबाहेर पडले.