मराठा आरक्षण द्या, नाहीतर उपमुख्यमंत्र्यांना कार्तिकी एकादशीची महापूजा करू देणार नाही
मराठा समाजाच्या या आंदोलनाचा कार्तिकी एकादशीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या. नाहीतर कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
येत्या 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. यादिवशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते. मात्र यंदा या पूजेत उपमुख्यमंत्र्यांनी सहभागी होण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. आम्हाला मराठा आरक्षण द्या अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पायही ठेवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा सकल मराठा समाजाने घेतला आहे. आमदार ,खासदार किंवा मंत्री कोणालाही ही पूजा करू देणार नसल्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत विठ्ठल मंदिरात दर्शनाला कोणत्याही राजकीय नेत्याला मंत्र्याला येऊ देणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
कार्तिकी एकादशीला महापूजा कोण करणार?
राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. कार्तिकी एकादशीला महापूजेचा मान हा उपमुख्यमंत्र्यांचा असतो. पण सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्याने हा मान कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे.
मराठा आरक्षणाबाबत मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभर आंदोलनं केली जात आहेत. आज संध्याकाळी मराठा समाज कँडल मार्च काढणार आहे. पाच वाजल्यापासून मराठा समाज या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे. 15 किलोमीटर अंतर हा कँडल मार्च असणार आहे. 123 गावातील नागरिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शहागड फाटा इथून अंतरवाली सराटीपर्यंत कॅडल मार्च काढण्यात येणार आहे. या कॅडल मार्च मध्ये 123 गावातील हजारो महिला, पुरुष, तरुण तरुणी सहभागी होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणसाठी कॅडल मार्च काढण्याचं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.