गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड,मनोज जरांगेंना तातडीने अटक करा
मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड मराठा आंदोलनकांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांना तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
मात्र या तोडफोडीच्या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांवर सडकून टीका केली आहे. मनोज जरांगे यांना तातडीने अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
वाहनांच्या घटनेचा निषेध करताना गुणरत्न सदावर्ते यांनी, हीच आहे का तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांना विचारला आहे. 50 टक्के खुल्या वर्गासाठीचा माझा संघर्ष सुरुच राहिल. मला कुणीही शांत करु शकत नाही.
माझ्या मुलीला आणि पत्नीलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीमुळे माझी मुलगी गेल्या 8 दिवसांपासून शाळेत जात नाही. पोलिसांसमोरच माझ्या वाहनांची तोडफोड केली गेली. हल्ल्याची माहिती पोलिसांना आधीपासूनच होती, असा आरोपही सदावर्ते यांनी केला आहे.
कॉल, मेसेज , सोशल साईटवर मला धमक्या दिल्या जात आहेत. कितीही हल्ले झाले तरी माझा लढा सुरूच ठेवणार आहे. मनोज जरांगे यांना तातडीने अटक करण्याची मागणीही गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्टनुसार मनोज जरांगे पाटलांना अटक करा, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं.
हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. माझी हत्या झाली तरी मी गुणवंतांसाठी लढा सुरुच ठेवणार. सरकारने फक्त मनोज जरांगेंचं ऐकू नये आमचंही ऐकावं. नाहीतर मी सुद्धा आमरण उपोषण करेन, असा इशाराही गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.