तुळजाभवानीच्या पालख्यांचे आगमन बंदुकीच्या फैरी झाडून सलामी,ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा…
कोल्हापूर : हत्ती घोडे उंट अंबारी असा शाही लवाजमा, करवीर निवासिनी श्री अंबाबाई तुळजाभवानीच्या पालख्यांचे आगमन बंदुकीच्या फैरी झाडून सलामी, शाहू महाराजांच्या हस्ते शमी पूजन अशा पारंपारिक व मंगलमय वातावरणात मंगळवारी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा रंगला.
धर्मसत्ता आणि राजसत्तेचा अनोखा मिलाप घडवणाऱ्या या सोहळ्याने कोल्हापूरवासी यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. राज्य महोत्सवाचा दर्जा मिळालेल्या या शाही दसरा सोहळ्याला अनुभवण्यासाठी कोल्हापूरकरच नव्हे तर अन्य जिल्ह्यांमधून, राज्यांमधून आलेल्या नागरिकांनी अलोट गर्दी केली होती.
शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता विजयादशमी या सोहळ्याने होते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या विजयाचा हा सोहळा, आणि संस्थानकालीन शाही दसरा सोहळ्याची परंपरा आजही तितक्याच दिमाखात सुरू आहे. सायंकाळी पाच वाजता अंबाबाई मंदिरातून अंबाबाईची पालखी तसेच भवानी मंडपातून तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची शाही लवाजम्यांनीशी मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदा या सोहळ्याची व्याप्ती वाढल्याने मिरवणुकीमध्ये उंट घोडे हत्ती अंबारी, कोल्हापूरच्या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, पारंपारिक वेशभूषा व फेटे घातलेले मानकरी, पारंपारिक वाद्यांचा गजर अशा शाही मिरवणुकीने पालख्या ऐतिहासिक दसरा चौकात आल्या. दुसरीकडे न्यू पॅलेस मधून ऐतिहासिक मेबॅक कार मधून शाहू छत्रपतींचे आगमन झाले.
सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांच्या मुहूर्तावर दसरा चौकातील ऐतिहासिक लकडकोटा येथे येऊन शाहू महाराजांनी शमी पूजन केले. देवीची आरती झाल्यानंतर त्यांनी सोने लुटले. यावेळी माझी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, शहाजीराजे यशराजराजे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पद्मश्री डॉ. डी वाय पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, संजय डी पाटील, आमदार जयंत आसगावकर आमदार जयश्री जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, आयुक्त के. मंजूलक्ष्मी, लोकमत संपादक वसंत भोसले, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह राजघराणे व सरदार घराण्यातील मानकरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाहू छत्रपतीनी ऐतिहासिक मेबॅक कार मध्ये उभे राहून कोल्हापूर वासियांकडून सोने स्वीकारले. त्यानंतर हा शाही लवाजवा जुना राजवाड्याकडे गेला. जुना राजवाड्यामध्ये संस्थानकालीन परंपरेनुसार सोने देण्याचा कार्यक्रम होतो. तुळजाभवानी देवीची पालखी देखील जुना राजवाड्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई ची पालखी मात्र सिद्धार्थ नगर मार्गे पंचगंगा घाटावर गेली. येथे आरती व पूजन झाल्यानंतर रात्री उशिरा अंबाबाई ची पालखी मंदिरात परतली.