रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या FCRA विभागाने दिली ‘ही’ मंजूरी!
परदेशात राहणारे रामभक्तही राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी देऊ शकतील. राम मंदिराच्या उभारणीसाठी परदेशी देणग्या घेण्याचा अडथळा आता दूर झाला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने केलेला अर्ज भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या FCRA विभागाने मंजूर केला आहे.
राम मंदिर ट्रस्ट आता जगातील कोणत्याही चलनात देणगी स्वीकारु शकते.
दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, कोणत्याही ट्रस्टला परदेशी देणग्या घेण्यासाठी गृह मंत्रालयाला किमान 3 वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल सादर करावा लागतो. राम मंदिर ट्रस्टला फेब्रुवारी 2023 मध्ये 3 वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर तीन वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल तयार करुन जुलैमध्ये अर्ज करण्यात आला. ज्याला आता गृह विभागाची परवानगी मिळाली आहे. राय पुढे म्हणाले की, परदेशात असलेल्या राम भक्तांनी अनेकदा मंदिराच्या बांधकामासाठी निधी देण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु ट्रस्टला यासाठी कायदेशीर मान्यता नव्हती. आता हा अडथळा दूर झाला आहे. परदेशात असलेले राम भक्त मंदिराच्या बांधकामासाठी ऐच्छिक निधी देऊ शकतात.
विदेशी स्त्रोतांकडून मिळालेले कोणतेही ऐच्छिक योगदान केवळ 11 संसद मार्ग, नवी दिल्ली-110001 येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या खाते क्रमांक 42162875158 मध्ये स्वीकारले जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इतर कोणत्याही बँकेला आणि इतर कोणत्याही शाखेत पाठवलेले पैसे स्वीकारले जाणार नाहीत.
राम मंदिर ट्रस्टला दरमहा एक कोटींहून अधिक देणग्या मिळत आहेत
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, राम मंदिरासाठी प्रत्येक महिन्याला सुमारे एक कोटी रुपयांच्या देणग्या विविध माध्यमांतून येत आहेत. भक्त दररोज रोख, चेक, आरटीजीएस, ऑनलाइन पद्धतीने देणगी देत आहेत. याशिवाय, रामललाच्या देणगीतून दरमहा सुमारे 30 लाख रुपयांचे दानही मिळते. ट्रस्टने 2021 मध्ये निधी समर्पण मोहीम सुरु केली होती, ज्यामध्ये सुमारे 3500 कोटी रुपये मिळाले होते.