”एका ओबीसी नेत्याला संपवण्यासाठी २५ पक्ष एकत्र आले”, – देवेंद्र फडणवीस
वाशिम: (मानोरा ) नरेंद्र मोदी हे ओबीसी नेते आहेत. परंतु त्यांना संपवण्यासाठी तब्बल २५ पक्ष एकत्र आले आहेत. ओबीसी समाजासाठी मोदींनी अनेक मोठे निर्णय घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला.
परंतु आता काही लोक त्यांना विरोध करत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
भाजपच्या ओबीसी जागर यात्रेच्या समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, मंडल आयोगाला विरोध करणारे हेच आजचे विरोधक होते. आज देशाचा पंतप्रधान एक ओबीसी आहे. ओबीसींसाठी काम करणारा नेता पुढे येऊन काम करत आहे, मात्र या ओबीसी नेत्याला संपविण्यासाठी 25 पक्ष एकत्र आले आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भाषणं करीत नाही, तर त्यांच्या योजनांचा लाभ हा खर्या अर्थाने एससी, एसटी, ओबीसींना मिळाला आहे. राहुल गांधी सध्या ‘मोहब्बत की दुकान’ म्हणून फिरत आहेत. प्रेम हे दुकानात नाही, तर ते मनात असावं लागतं. काँग्रेस प्रेमाचे दुकान काल नागपुरात दिसले, असा टोला त्यांनी लगावला.
कार्यक्रमाला केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड,खासदार भावनताई गवळी, मंत्री अतुल सावे,आमदार आशीष देशमुख,माजी खासदार हंसराज अहिर,खासदार वाघमारे,रामदास तडस, आमदार राजेंद्र पाटणी,निलय नाईक,वसंत खंडेलवाल,रणधीर सावरकर,प्रतापदादा अडसड, माजी खासदार अनंतराव देशमुख,माजी मंत्री रणजित पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसने आजवर जे मुख्यमंत्री दिले, त्यातील केवळ 17 टक्के ओबीसी होते. मात्र भाजपाने जितके मुख्यमंत्री दिले, त्यातील 31 टक्के मुख्यमंत्री ओबीसी होते.