ताज्या बातम्या

आरक्षण दिल्याशिवाय घराचा उंबरा शिवणार नाही – जरांगे पाटील


अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेने गर्दीचे मराठवाड्यातील सगळे रेकाॅर्ड आज मोडले. (Manoj jarange Rally News) लाखोच्या संख्येने रखरखत्या उन्हात बसलेल्या समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी घराचा उंबरा शिवणार नाही, असा शब्द जरांगे यांनी आपल्या भाषणात दिला.

चाळीस मिनिटांच्या भाषणात जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढू. (Maratha Reservation) एकतर माझी अंतयात्रा निघेल, नाहीतर मराठा आरक्षणाच्या विजयाची जल्लोष यात्रा, असा विश्वासही जरांगे यांनी उपस्थितीत जनसमुदायाला दिला.

जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत सुरू केलेल्या उपोषणाला सतराव्या दिवशी यश मिळाले होते. (Jalna) ज्या राज्य सरकारने जरांगे यांचे आंदोलन पोलिस बळाचा वापर करत दडपण्याचा प्रयत्न केला तेच सरकार झुकले आणि महिनाभराची मुदत माघून घेत माघारी फिरले. (Marathwada) एकदा आंदोलन गुंडाळले की ते पुन्हा उभे राहणार नाही, असा सरकारचा समज होता, पण जरांगे यांनी तो खोटा ठरवला.

सरकारला दिलेली मुदत संपण्याआधाची जरांगे यांनी राज्याच्या विविध भागात फिरून सभा घेतल्या. १४ आॅक्टोबरच्या भव्य सभेची पार्श्वभूमी तयार केली आणि अंतरवाली सराटीत आज इतिहास घडला. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मनोज जरांगे यांनी दिलेल्या हाकेला समाजाने अशी काही साथ दिली की सभेच्या ठिकाणी नजर जाईल तिथे लोक, भगवे झेंडे आणि वाहनांची गर्दीच दिसत होती. जरांगे यांच्यावर समाजाने विश्वास दाखवला कारण त्यांचा शुद्ध हेतू आणि प्रामाणिकपणा भावला.

आंदोलनाच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांपैकी हा मराठा नाही, याची पावतीच राज्यभरातील दौऱ्यात आणि आज अंतरवाली सराटीतील सभेत लाखोंच्या गर्दीने जरांगे यांना दिली. आता जरांगे यांनीही मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळवून दिल्याशिवाय घराचा उंबरा शिवणार नाही, असा शब्द देत पुन्हा एकदा मनं जिंकली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ आॅगस्ट रोजी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू झाले. तिसऱ्या दिवशी म्हणजेच १ सप्टेंबर रोजी जरांगे यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आलेल्या पोलिसांनी विरोध होताच आंदोलकांवर लाठीमार केला.

अश्रुधुराच्या नळकांड्या, गोळीबार आणि त्यात दोन्ही बाजूची लोकं गंभीर झाली. पोलिसांनी केलेल्या या बळाच्या वापरामुळेच अंतरवालीत सुरू असलेले आंदोलन राज्यभरात गेले आणि त्याचा वणवा पेटला.

तेव्हापासून मराठा समाजाचा पोलिसांवर राग आहे. राज्य सरकारने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असली तरी घटनास्थळी दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे अद्याप मागे घेण्यात आलेले नाहीत. (Maratha Reservation) या पार्श्वभूमीवर अंतरवालीत आज होणाऱ्या सभेसाठी चौदाशे पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला होता. (Jalna) वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी, महिला यांच्यावर सभेच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

लाखोंच्या संख्येने उपस्थित मराठा समाज बांधवांमध्ये तरुणांची मोठी संख्या होती. तरुणांकडून पोलिसांबद्दल असलेला राग कुठल्याही परिस्थितीत व्यक्त होऊ नये, सभेला गालबोट लागू नये, याची काळजी स्वतः जरांगे पाटील घेताना दिसले. (Marathwada) सभेत येणाऱ्या प्रत्येकाला शांततेचे आवाहन करतानाच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन जरांगे वारंवार करत होते. पोलिसांनी आपल्याला सहकार्य केले आहे, ते आपल्याला मदत करत आहेत. त्यांनाही सहकार्य करा, मदत करा, कुठेही शांतता बिघडणार नाही याची काळजी घ्या, अशी विनंती जरांगे वारंवार करत होते.

सभेला मोठ्या संख्येने महिला, वृद्ध, लहान मुलं आलेली होती. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी जशी पोलिसांची होती, तशीच ती जरांगे आणि ज्या १२३ गावांतील लोकांनी आजची सभा आयोजित केली, त्यांचीदेखील होती. याची जाणीव सभेसाठी नियुक्त केलेल्या दहा हजार स्वयंसेवक आणि आयोजकांनाही होती. त्यामुळेच जरांगे यांनी आपल्या भाषणात पोलिसांना सहकार्य करण्याची सूचना संबंधितांना केली.

सभा संपल्यानंतर मैदानात कचरा राहणार नाही, याचीही काळजी घ्या, असे आवाहन जरांगे करत होते. अंतरवालीत पोलिसांकडून झालेला बळाचा वापर आणि त्यात जखमी झालेल्या आंदोलक, महिला याबद्दल समाजामध्ये संताप आहे. लाखोंच्या संख्येने तरुण जमा झाल्यावर याचा कुठे उद्रेक होऊ नये, या भावनेतून जरांगे यांनी पोलिसांना मदत आणि सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यांच्या या समयसूचकतेचे कौतुक होत आहे. सभा शांततेत पार पडली, कुठेही गोंधळ, गडबड किंवा गैरप्रकार झाला नाही. याचे श्रेय अर्थातच शांत आणि संयमी मराठा समाज, जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाते.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button