देश-विदेश

मोठी बातमी! दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली..


दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)वाढवली आहे. उद्यापासून 2000 रुपयांच्या नोटा (Rs. 2000 notes) व्यवहारात वापरता येणार नाहीत. बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवली आहे.

आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता, नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत मिळाली आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी अजूनही 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या नसतील त्यांना आता 7 ऑक्टोबरपर्यंत नोटा बदलता येणार आहे. एकाच वेळी कमाल 20 हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

आरबीआयनुसार, 29 सप्टेंबर 2023 पर्यंत 96 टक्के 2000 रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या 3.56 लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात होत्या. त्यानंतर आतापर्यंत 3.42 लाख कोटी रुपये मूल्य असणाऱ्या नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत.

7 ऑक्टोबरनंतर काय?

आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. त्यानंतर 8 ऑक्टोबरपासून बँकांच्या मार्फत नोटा बदलून देण्याची प्रक्रिया थांबवण्यात येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 8 ऑक्टोबरपासून आरबीआयने निश्चित केलेल्या केंद्रात 2000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत. याच ठिकाणाहून नोटा बदलून मिळणार आहे.

19 मे 2023 रोजी घेतला होता RBI ने निर्णय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी चलनातून 2000 रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली होती. यासाठी बँकेने लोकांना 4 महिन्यांची मुदत दिली होती. जेणेकरून ते त्यांच्या बँकेत किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या जुन्या नोटा सहज बदलू शकतील. त्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 रोजी संपत होती. मात्र, आरबीआयने आढावा घेत नोटा बदलून देण्यासाठी मुदत वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेने एकावेळी 20,000 रुपयांपर्यंतच्याच 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची मर्यादा घातली आहे.

2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय का?

2000 रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये जारी करण्यात आली. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती. सामान्य व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांची नोट वापरली जात नसल्याची बाब समोर आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या “क्लीन नोट पॉलिसी” च्या अनुषंगाने, 2000 रुपये मूल्याच्या बँक नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button