राज्यभर गणेश विसर्जनाच्या उत्साह ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर’ या जयघोषाने श्रीगणेशाला निरोप
राज्यात सगळीकडेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाले आणि त्यानंतर आज अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मानाचे गणपती विसर्जित होत आहे
पुण्यातील सर्व मानाच्या गणपतीचे विसर्जन
मानाच्या गणपतींची मिरवणूक तब्बल ९ तासांपेक्षा अधिक काळ चालली आहे. ढोल ताशा पथक आणि पारंपरिक पद्धतीने ५ ही मानाच्या गणरायाला निरोप दिला आहे.
मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जन वेळ: ४ वाजून ३६ मिन
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी विसर्जन वेळ: ५ वाजून १२ मिन
मानाचा तिसरा गुरुजी तालीम विसर्जन वेळ: ५ वाजून ५३ मिन
मानाचा चौथा तुळशीबाग विसर्जन वेळ: ६ वाजून ३२ मिन
मानाचा पाचवा केसरी वाडा विसर्जन वेळ: ६ वाजून ५९ मिन
पुण्यातील मानाचा पाचव्या गणपतीचं विसर्जन, आठ तास चालली मिरवणूक
पुण्यातील सर्व मानाच्या गणपतींचं विसर्जन झालं आहे. पुण्यातील पाचवा केसरीवाडा येथील गणपतीच्या मिरवणुकीला आठ तास लागले.
संध्याकाळ होताच पुण्यात डीजेचा दणदणाट; बाप्पाला निरोप देण्यात तरुणाई बेधुंद
पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू असून वाजत गाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. पारंपारिक वाद्याच्या गजरात आनंददायी वातावरणात गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. विशेष म्हणजे गणपती बाप्पाला निरोप दिला जात असताना वरून राजाने देखील हजेरी लावली आहे. पावसात नाचत चिंब भिजवून कार्यकर्ते मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत.
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आता डी जे “धिंगाणा” सुरू झालाय. संध्याकाळ होताच डीजेचा दणदणाट पाहायला मिळतोय. पुण्यातील बाजीराव रोड, टिळक रोड, कुमठेकर रोडवर डीजेवर तरुणाई बेधुंद झालीये. पुणे शहरातील विविध मंडळांकडून संध्याकाळी विसर्जन मिरवणुकीसाठी डीजे लावण्यात आलाय. डीजेच्या तालावर तरुणाई थिरकायला सुरूवात झाली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांकडून जुहू चौपाटीवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा; पोलिसांना दिल्या महत्वाच्या सूचना
आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईत गणपती विसर्जन सुरू आहे. गणपती विसर्जन स्थळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. याच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. मुंबईतील गिरगाव, जुहू, दादर आणि वर्सोवा या प्रमुख चौपाट्यांवर विसर्जन होत आहे. मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावरील पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थेचा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी पोलिसांना सुरक्षा बंदोबस्त कुठेही कमी पडता कामा नये अशा सूचना देखील केल्या.
यवतमाळमध्ये गणेश विसर्जनादरम्यान नदीत बुडून युवकाचा मृत्यू
यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरी अरब ईथे गणपती विसर्जनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. यवतमाळमधील अडाण नदीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हितेश पंचबुद्धे असं या तरुणाचं नाव आहे.
पुण्यातील पहिल्या आणि दुसऱ्या मानाच्या गणपतीचे विसर्जन
मानाचा पहिला गणपती श्री कसबा मंडळाच्या गणपतीचे ४. ३७ वाजता विसर्जन झाले आहे. मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे विसर्जन ५.११ वाजता झाले.
दगडुशेठ गणपतीची मिरवणूक
यंदा पहिल्यांदाच दगडुशेठ गणपतीची मिरवणूक दुपारी ४ वाजता निघाली.
पुण्यात विसर्जन मिरवणुकीत मुसळधार पावसाला सुरुवात; भाविकांमध्ये उत्साह आणि आनंद कायम
पुण्यात पावसाची संतधार सुरूच आहे. गणेश विसर्जनावेळी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र भाविकांमध्ये उत्साह आणि आनंद कायम आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी जमलीये.
लातूर म.न.पा.च्या वतीन मूर्ती विसर्जनासाठी पहिला अनोखा उपक्रम
आज सर्वत्र श्री गणेशाच्या विसर्जनाची लगबग सुरू आहे. मात्र लातूर महानगरपालिकेने गणेशाच्या विसर्जनासाठी पर्यावरण पूरक उपक्रम राबवलाय. प्रदूषण मुक्त आणि प्रदूषण टाळण्यासाठी लातूर शहरात बाप्पाच्या मूर्तीचे इतर कुठेही पाण्यात विसर्जन न करता महापालिकेच्या वतीने शहरात 15 ठिकाणी मूर्ती संकलन स्टॉल उभा करण्यात आले आहेत. संकलन केलेल्या मूर्ती एकत्र विसर्जित करण्यात येणार आहेत.
पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं विसर्जन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीची विसर्जन मिरवणूक थाटात निघाली. विसर्जनाच्या रथाला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती.
मानाचा पहिला गणपती कसबा गणपती अलका चौकात
पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती अलका चौकात आला आहे. सकाळी १० वाजता कसबा गणपतीची मिरवणूक निघाली होती. अलका चौकात मानाच्या पहिल्या गणपतीचे स्वागत करण्यासाठी भव्य रांगोळी काढण्यात आली.
पुण्यातील मानाचे पाचही गणपती मार्गस्थ
पुण्यातील मानाचे पाचही गणपती मार्गस्थ झाले आहेत. इतर मंडळाचे गणपती देखील आता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत आहे. आपल्या लाडल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
नाशिकमध्ये ११ वाजेपर्यंत ४७६१ गणेश मूर्तींचे विसर्जन, नाशिक महापालिकेची माहिती
नाशिकमध्ये ११ वाजेपर्यंत ४७६१ गणेश मूर्तींचे विसर्जन, नाशिक महापालिकेची माहिती. सर्वाधिक मूर्ती संकलन नाशिकच्या पंचवटीमध्ये. पंचवटीत एकूण ३१२४ मूर्तींचे संकलन. प्रदूषणमुक्त गोदावरी ठेवण्यासाठी नागरिकांची मूर्ती संकलन केंद्राला पसंती.
‘लालबागचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, भक्तांची मोठी गर्दी
‘लालबागचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, भक्तांची मोठी गर्दी. गणपतीवर जागोजागी हार आणि फुलांची उधळण.
छत्रपती संभाजीनगर : संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदिपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट यांच्यासह सर्व पक्ष नेते रथ ओढत आहेत.
नंदुरबारमध्येही बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्त सज्ज
नंदुरबार जिल्ह्यात 217 सार्वजनिक गणेश मंडळाचे तर अनेक खाजगी गणेश मंडळाच्या बाप्पाला आज निरोप दिला जाणारा असून, प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ग्रामीण भागात सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली आहे.
‘लालबागचा राजा’च्या विसर्जनासाठी भाविकांची गर्दी
कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात. तुकाराम माळी तालीम मंडळाच्या बाप्पाच्या मिरवणुकीने या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात.
मुंबईचा मानाचा गणपती ‘मुंबईचा राजा’ विसर्जनासाठी मार्गस्थ
अनंत चतुर्दशीच्या निमित्याने पुणे मेट्रो सेवेत ४ तासांची वाढ, २९ तारखेच्या पहाटे २ वाजेपर्यंत सुरु राहणार
कसबा गणपती पालखीत विराजमान
कसबा गणपती पालखीत विराजमान. काहीच क्षणात कसबा गणपतीची पालखी निघणार. पुण्यातील मंडई येथे असलेल्या टिळक पुतळ्यापासून होणार मुख्य मिरवणुकीला सुरुवात.
कोल्हापुरातील मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती मिरवणूक मार्गावर
कोल्हापुरातील मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती मिरवणूक मार्गावर आला. जिल्हाधिकारी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते मिरवणुकीला काही वेळात सुरुवात होणार आहे.
पुण्यात विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा बारीक लक्ष
पुण्यात विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा बारीक लक्ष. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून मिरवणुकीवर ‘वॉच’. पुण्यात आज ९ हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात. प्रमुख मिरवणूक मार्गांवर २०५ सीसीटीव्ही. पोलीस आयुक्तालय आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून संशयितांच्या हालचालींवर लक्ष.
कसबा गणपतीच्या उत्तर पूजेला सुरुवात
कसबा गणपतीच्या उत्तर पूजेला सुरुवात. कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे उपस्थितीत. उत्तर पूजा झाल्यानंतर कसबा गणपती ची होणार आरती
राष्ट्रीय कला अकादमीकडून कसबा गणपती बाप्पाच्या बाहेर पायगड्या आणि रांगोळी
राष्ट्रीय कला अकादमीकडून कसबा गणपती बाप्पाच्या बाहेर पायगड्या आणि रांगोळी काढण्यात आली असून हे पाहण्यासाठी भाविकांनी देखील गर्दी केलेली आहे. गेला 25 वर्षांपासून राष्ट्रीय कला अकादमी कडून पुण्यातील मानाच्या गणपती समोर पायघड्या आणि रांगोळ्या काढल्या जातात.