धावत्या रेल्वेमध्ये महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार आरोपीचा एन्काऊंटरमध्ये खात्मा
अयोध्येत धावत्या रेल्वेमध्ये महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी अनिस रियाझ खान (वय 30) याचा ‘यूपी एसटीएफ’ने एका एन्काऊंटरमध्ये खात्मा केला. दोन अन्य आरोपी जखमी झाले.
त्यांना अटक करण्यात आली आहे. चकमकीत एक उपनिरीक्षक आणि 2 कॉन्स्टेबलही जखमी झाले.
अयोध्येतील पुराकलंदर ठाण्यांतर्गत छतरिवा पारा कैल रस्त्यावर ही चकमक झाली. इनायतनगर भागात अनिस व अन्य आरोपी लपून असल्याचे ‘एसटीएफ’ला कळले. पोलिसांनी घेराव घातला. अनिसने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आझाद तसेच विशंभर दयाल हे अन्य आरोपीही जखमी झाले.
पुराकलंदर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रतन शर्मा यांच्यासह दोन्ही जखमी कॉन्स्टेबल्सवरही उपचार सुरू आहेत. 30 ऑगस्ट रोजी शरयू एक्स्प्रेसमध्ये महिला हेड कॉन्स्टेबलवर अनिसने अत्याचार केला होता. रक्ताने माखलेली महिला कॉन्स्टेबल ट्रेनच्या सीटखाली सापडली होती. विजार अंगावर नव्हती. या घटनेचा व्हिडीओही समोर आला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वत:हून त्याची दखल घेतली होती. अनिस आणि त्याचे साथीदार गुन्हा घडल्यापासून फरार होते.