धार्मिक

CM शिंदे, राज ठाकरेसह नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन..


सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. सार्वजनिक मंडळांपासून ते घरोघरी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी आणि मोठा सोहळा सुरु आहे. देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. सकाळपासूनच बाप्पांच्या दर्शनासाठी आणि आगमनासाठी मोठी गर्दी झाली आहे.

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अगदी सर्वसामान्यांसह राजकीय नेते, सेलिब्रटी यांनीही बाप्पाचं घरी दणक्यात स्वागत केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सुद्धा बाप्पांचं आगमन मोठ्या उत्साहात झालं आहे. ठाकरे कुटुंबात गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळाली. यावेळी राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांनी स्वतः बासरी वाजवत गणरायाचं स्वागत केलं आहे. गणरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण ठाकरे परिवार एकत्र आले होते. अमित ठाकरे यांच्या हस्ते घरी बाप्पा विराजमान झाले.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचे आगमन

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते यावेळी पूजा, आरती करण्यात आली. यावेळी मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश यांच्यासह कुटुंबातील सदस्य, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो. मी काल जम्मू-काश्मीरमध्ये होतो. श्रीनगरच्या लाल चौकात लोक गणेशोत्सव साजरा करत होते. ‘विघ्नहर्ता’ महाराष्ट्रातील जनतेसमोरील सर्व अडथळे दूर करील अशी मी प्रार्थना करतो.”

गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी मंदिरापासून घरोघरी गजाननाची प्रतिष्ठापना केली जाते. विघ्नांचा नाश करणाऱ्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्याच्या परंपरेसह भाविक गणेशाची पूजा करतात. राजकीय नेत्यांच्या घरी देखील बाप्पांचे आगमन झाले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईतील राजभवनात गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीची पूजा आणि आरती केली.

 

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी देखील गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. त्यांच्या संपुर्ण परिवाराने यावेळी गणपती बाप्पाची आरती केली


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button