शिरुरमध्ये महादेव जानकरांची एन्ट्री, आढळराव-कोल्हेंचं गणित बिघडणार?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे. भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट एका बाजूला तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी रणनीती आखली जात आहे.
पुण्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव यांच्यात लढत होणार आहे, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. परंतु आता शिरुरच्या सामन्यात महादेव जानकर यांनी एन्ट्री मारल्याची माहिती समोर आली आहे.
रासपचे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जानकर यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात जनयात्रा काढली आहे. शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी येथून महादेव जानकर यांनी जनयात्रेची सुरुवात केली होती. सव्वा लाखाहून अधिक मतदारांशी जानकर यांनी संवाद साधल्याची माहिती आहे. त्यामुळं महादेव जानकर यांनी शिरुरमध्ये एन्ट्री केल्यानं अमोल कोल्हे यांची राजकीय समीकरणं बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी २०१४ साली महादेव जानकर यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातून निसटता पराभव झाला होता.शिरुर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवाजीराव आढळराव हे गेल्या अनेक वर्षांपासून शिरुरचे खासदार होते. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंनी आढळरावांची सद्दी संपवली होती. त्यानंतर आता महादेव जानकर यांनी बारामती सोडून थेट शिरुरमध्ये एन्ट्री केली आहे. त्यामुळं कोल्हे-आढळराव यांच्यात होणारा दुहेरी सामना तिरंगी होणार आहे. परिणामी शिरुरची लढत आणखी रंगतदार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.