बीड नगरपालिकेची जागा शेत दाखवून उतरवला पीक विमा
बीड : तेलंगणा राज्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर, नागपूर व पुणे जिल्ह्यातील व्यक्तींनी बीड नगरपालिकेची जागा शेत दाखवून तब्बल १६ हजार २२९ एकरचा पीक विमा उतरवला असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
भारतीय पीक विमा कंपनीच्या चौकशीत वेगवेगळी प्रकरणे समोर येत असल्याने पीक विमा घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे.
राज्यासह बीड जिल्ह्यात १ रुपया भरून पीक विमा योजनेचा पहिलाच प्रयोग खरीप हंगामात राबविण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याने योजनेत सहभाग घेत पीक विमा उतरवला. परंतु, काही शेतकऱ्यांनी अतिरिक्त विमा भरल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रापेक्षा अधिक पीक विमा काढला गेल्याने भारतीय पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कृषी व महसूल विभागासह संयुक्त पद्धतीने जायमोक्यावर जाऊन तपासणी केली. गावागावात जाऊन अतिरिक्त विमा भरलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेतली असता काही गावात ना शेतकरी सापडले ना त्यांची शेती सापडली. दरम्यान, यापूर्वी बीड एमआयडीसीचा परिसर शेत दाखवून १८० जणांनी ४६७ एकरचा पीक विमा, तर अंबाजोगाई तालुक्यातील एकाच गावातील २७९२ एकरचा विमा उतरवला होता. आता तर बीड नगरपालिकेची जागा शेत दाखवून विमा उतरवला असल्याचे समोर आले आहे.
१३ जणांनी भरला न.प. जागेवर विमा
बीड येथील नगरपालिकेची जागा शेत दाखवून वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांनी पीक विमा भरला आहे. पीक विमा कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातील अनकपूर येथील उत्तम पंजाराम ढेरे यांनी ८६ एकर, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील आदित्य चंद्रमणी वने यांनी २५०५ एकरचा विमा उतरवला आहे. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मण भरत तेहाले यांनी १६४३ एकर, नागपूर जिल्ह्यातील मौंदा येथील मंदाबाई अंकुश राठोड यांनी ६३२ एकर, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील घोणसी बु्द्रुक येथील मीना ढेरे यांनी ६३० एकर, राम प्रसाद ढेरे ४४०३ एकर, सचिन गोफने यांनी १२१० एकर, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुसेगाव येथील राजू अंकुश राठोड यांनी २४२१ एकर एवढ्या मोठ्या प्रमाणात विमा भरला आहे.
तलाठी यांनी दिला रिपोर्ट
भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब इनकर यांनी बीड तहसीलदार यांना पत्र लिहून अतिरिक्त पीक विमा भरणाऱ्यांची यादी पाठवली होती. त्यानुसार तलाठ्यांनी सजा बलगुजर, बीड पिंगळे, बीड खोड व आहेर धानोरा या गावातील अभिलेखे तपासले असता सदरील शेतकऱ्यांची नावे आढळून आली नव्हती. त्यावरून १८८ शेतकऱ्यांनी ६३६८ हेक्टर अर्थात १६ हजार २२९ एकर क्षेत्रातील नियमबाह्य पीक विमा भरला असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा पीक विमा रद्द करावा, असे तहसीलदारांनी पीक विमा कंपनीला कळविले आहे.
पीक विमा रद्द केला जाईल
ज्या शेतकऱ्यांनी क्षेत्र नसतानाही पीक विमा भरला आहे त्यांचा पीक विमा रद्द केला जाईल. या संबंधीचा अहवाल आमच्या कंपनीच्यावतीने कृषी आयुक्त व जिल्हा कृषी विभागास दिला जाईल.
-बाबासाहेब इनकर, जिल्हा व्यवस्थापक, भारतीय कृषी विमा कंपनी