मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था! मनसे कार्यकर्त्यांनी बांधकाम मंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरावस्थेचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनसेकडून या मुद्द्यावर आज आंदोलन करत आक्रमक भूमिका घेण्यात आली. अभियंता दिनानिमित्त विशेष कार्यक्रामाचे आयोजन करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि कर्मचाऱ्यांचा आज सरकारकडून सत्कार करण्यात आला.
मात्र या कार्यक्रमात मनसेने जोरदार आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी मनसेकडून काही दिवसांपासून केली जात आहे. आजही मुंबईतील षण्मुखानंद सभागृहाबेर मनसेने आंदोलन केलं. जर कामंच झालेलं नाही तर तुम्ही यांचे सत्कार कसले करता? असा सवाल मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुंबई गोवा महामार्गावरच्या एकाच लेनचे काम झाले आहे मात्र त्यावरही खड्डे पडले आहेत असा आक्षेप मनसे कार्यकर्त्यांनी केले. साम टीव्हीने यासंबंधिचे वृ्त्त दिले आहे.
दरम्यान या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित होते. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधतही घोषणाबाजी केली. तसेच त्यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले. पोलिसांनी संदीप देशपांडे यांना तसेच अन्य सर्व कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतलं.