मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत !
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला होता. यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. सरकारकडून सातत्याने आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मात्र जरांगे अध्यादेशावर ठाम असल्याने सरकार हतबल झाले आहे. त्यामुळे सरकार मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार विशेष विधेयक मांडण्याच्या विचारात आहे. अर्थात मराठा आरक्षणासाठी सरकार विधेयक आणणार अशी चर्चा सरकारच्या प्राथमिक पातळीवर चर्चा सुरू असल्याचं सुत्रांनी सांगितलं. तसेच अध्यादेश आणला तर टिकाणार नाही असंही सरकारचं मत आहे
मंत्री गिरीश महाजन यांनी संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्यासह बुधवारी आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती. मात्र या चर्चेतून काहीही तोडगा निघाला नव्हता. या पार्श्वभूमीवर कॅबिनेट बैठक होणार असून त्यात काही निर्णय होण्याची शक्यता आहे